मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाल्याची माहिती होती. उपमुख्यमंत्रिपदाबाबत असलेल्या साशंकतेमुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा (Ajit Pawar Unhappy Again) आहे. अखेर सुप्रिया सुळे यांनी फोन करुन अजित पवारांशी बातचित केली. परंतु अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरु आहे, असा प्रश्न पडला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (गुरुवार 28 नोव्हेंबर) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर हा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महाविकासआघाडीच्या दृष्टीने इतक्या महत्त्वाच्या दिवशी अजित पवार मात्र नाराज असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ हे अजित पवारांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. मात्र अजित पवार तिथे नसल्याच मुश्रीफ यांनी सांगितलं. अजित पवारांनी सकाळच्या वेळेत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. परंतु त्यानंतर त्यांचा कोणाशीही संपर्क होत नव्हता
राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद देण्याबाबत महाविकासआघाडीच्या बैठकीत निश्चित झालं आहे. मात्र उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांचं नाव आघाडीवर असल्यामुळे अजित पवार खट्टू झाल्याचं बोललं जात. अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद हवं असल्यामुळे त्यांनी नाराजीचा सूर लावल्याची चर्चा आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याबाबत ठरलं, तरी ते आज मंत्रिपदाची शपथ घेणार नसल्याचं म्हटलं जातं.
दरम्यान, ‘टीव्ही9 मराठी’च्या वृत्तानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांशी फोनवरुन संपर्क साधला. अजितदादा सिल्व्हर ओकवर आल्यानंतर आम्ही पाच वाजता एकत्रच शपथविधीला येऊ, असं सुळेंनी सांगितलं.
अजित पवार यांचं नाराजीनाट्य नवीन नाही. त्यांनी गेल्या आठवड्यात बंड पुकारत देवेंद्र फडणवीसांशी हातमिळवणी केली होती. त्यानंतर भाजप सरकारच्या जोडीने शनिवारी (23 नोव्हेंबर) उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांची मनधरणी सुरु केली. अखेर 26 नोव्हेंबरला यश आलं आणि अजित पवारांचं मन वळलं. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने फडणवीस सरकारही कोसळलं. त्यानंतर अजितदादा पवार कुटुंबासोबत दिसल्याने सर्वकाही आलबेल असल्याचं चित्र दिसलं.
दुसरीकडे, विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादीतून विरोध होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव आता विधानसभा अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे.
विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाला विरोध, कोणाचं नाव आघाडीवर?
काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण शपथ घेणार असल्याचं म्हटलं जातं. मात्र अशोक चव्हाणांना विधानसभा अध्यक्षपद देण्यावर शिक्कामोर्तब झालं, तर पृथ्वीराज चव्हाण कॅबिनेटमध्ये दिसणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्षपद देण्याबाबत फारसे अनुकूल नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. परंतु खुद्द अशोक चव्हाण विधानसभा अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत अनुत्सुक असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता आहे. Ajit Pawar Unhappy Again