मी लपून काही करत नाही, तिथंही गेलो, इथंही मजबूत बसलो, तुमचाच कोणी ज्योतिरादित्य शिंदे होईल : अजित पवार

| Updated on: Mar 13, 2020 | 1:41 PM

शिवसेनेला फसवणं ही चूक होती असा उपरोधिक टोला मुनगंटीवारांनी लगावला होता, त्यावरुन अजित पवारांनी टोलेबाजी केली. (Ajit Pawar on Jyotiraditya Scindia) 

मी लपून काही करत नाही, तिथंही गेलो, इथंही मजबूत बसलो, तुमचाच कोणी ज्योतिरादित्य शिंदे होईल : अजित पवार
Follow us on

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत चांगलीच टोलेबाजी केली. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान उत्तर देताना अजित पवारांनी (Ajit Pawar on Jyotiraditya Scindia) अर्थसंकल्प कसा सर्वसमावेशक आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोधी पक्ष भाजपकडून जोरदार विरोध करण्यात आला. अजित पवारांच्या भाषणादरम्यान मध्य प्रदेशातील ‘ऑपरेशन लोटस’चाही उल्लेख झाला. शिवसेनेला फसवणं ही चूक होती असा उपरोधिक टोला मुनगंटीवारांनी लगावला होता, त्यावरुन अजित पवारांनी टोलेबाजी केली. (Ajit Pawar on Jyotiraditya Scindia)

पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात 2013-14 मध्ये मंजुर झालेल्या निधीला फडणवीसांनी सत्तेवर आल्यानंतर स्थगिती दिली होती. त्याचा उल्लेख अजित पवारांनी केला.अजित पवार म्हणाले, “कधी कधी काट्यानं काटा काढला जातो. त्यामुळं पुन्हा सत्तेत आल्यावर असं (स्थगितीचं) करु नका. चार दिवस सासूचे, चार दिवस सूनेचे असतात”.

मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन, कमलनाथ सरकारला मोठा झटका दिला. शिंदे भाजपमध्ये गेल्यामुळे तिथलं सरकार डळमळीत झालं आहे. मध्य प्रदेशातील राजकीय परिस्थितीचा हा दाखला देत, भाजप आणि विरोधी पक्षातील नेते महाराष्ट्रातही तसंच होईल असा दावा करत आहेत. एक ना एक दिवस चूक होईल, कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे महाराष्ट्रातही येईल, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते.  त्यावर अजित पवारांनी विधानसभेत टोलेबाजी केली.

तुम्ही कितीही म्हटले चुकी झाली, पण आम्ही मुख्यमंत्र्यांना म्हणतो चुकीला माफी नाही. इकडचा कोणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही. तिकडचाच कोणी होईल याची काळजी घ्या.आज बरेच जण गैरहजर आहेत, त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवा, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

आकड्यांची तुलना केल्यामुळे जनतेलाही कळेल. वंचित घटकांच्या विकासासाठी आमचं सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे त्यासंबंधी विभागांच्या निधीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. स्थानिक आमदार निधीतही वाढ केली, त्याचं स्वागत सर्वांनी केली. डोंगरी विकासासाठी ज्या तालुक्यांना 50 लाख मिळत होते त्यांना 1 कोटी आणि ज्यांना 1 कोटी मिळत होते त्यांना 2 कोटी रुपये दिले जातील.

सन 2013-14 मध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात ग्रामविकास विभागाला 1600 कोटी रुपये वर्ग झाले. त्यानंतर सरकार बदललं, फडणवीस मुख्यमंत्री झाले, चंद्रकांत पाटील दोन नंबरचे मंत्री झाले.  फडणवीस सरकारने या 1600 कोटी रुपयांचा पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आणि काही कामं वगळण्यात आली. शिवाय 1600 पैकी 1100 कोटी रुपयांच्या कामाला स्थगिती देण्यात आली. जे त्यावेळेस झालं, त्यापैकी थोडसं यावेळेस झालं. शेवटी काय इथल्याही आमदारांना वाटतं आम्ही आमदार झालो, आम्हालाही निधी द्या, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी 4-4 कोटी दिले. त्यावर मी म्हणालो यांना 4-4 कोटी दिले तर त्यांनाही 1-1 कोटी द्या, ते दिले.

परत संधी मिळाली तर असं वागू नका (भाजपला टोला). कारण कधी कधी काट्याने काटा काढला जातो. चार दिवस सासूचे असतात तर चार दिवस सूनेचे येतात. तुम्हीही लोकांचं प्रतिनिधीत्व करता, दुजाभाव करुन चालत नाही. मी उपमुख्यमंत्री होण्याच्या आधी जे 7 लोक (मंत्री) होते, त्यावेळी हे झालं. त्यामुळे माझं काहीच चाललं नाही. तुम्ही सतत म्हटलं यांचंच चालतं (अजित पवार) तर तसं होत नाही. किंवा सुधीर मुनगंटीवार कितीही म्हणले की आमची चूक झाली तर आता माफी नाही.

माझं म्हणणं आहे की असं म्हणून विरोधात पाच वर्ष काढली तरी चालतील. होणार आहे, होणार आहे सरकार आपलं येणार आहे असं म्हणूनच तुम्हाला आमदार सांभाळावे लागतील. नाहीतर ते कवाच उधळतील. पटापटा इकडं तिकडं जातील.

इकडं कुणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, तिकडंच कुणीतर होईल लक्षात ठेवा. कारण काही काही गैरहजर आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवा. मी काही लपून करत नाही, समोर करतो. आणि तिथंही केलं आणि इथंही आलो आणि मजबूत बसलो आहे.