तुम्ही आमच्या वहिनींना पाडलं, आम्ही तुम्हाला पाडणारच… रोहित पवार यांना कुणी दिला इशारा?

| Updated on: Aug 15, 2024 | 12:39 PM

येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मात्र आता सर्वाधिक जागा लढाव्यात अशी भाजपाच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. तसेच अजितदादांचे लोढणे आपल्या गळ्यात नको असेही भाजपा कार्यकर्त्यांना वाटत असून भाजपाने शतप्रतिशत जागा लढून मुख्यमंत्री पद घ्यावे असे म्हटले जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सध्या सर्व चुकांची उजळणी करीत आहेत.

तुम्ही आमच्या वहिनींना पाडलं, आम्ही तुम्हाला पाडणारच... रोहित पवार यांना कुणी दिला इशारा?
Follow us on

लोकसभेत जोरदार फटका बसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार सध्या नरमाईच्या भूमिकेत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या जोरावर आपण मध्यप्रदेश प्रमाणे सत्तेवर येण्यासाठी अजितदादा गुलाबी रंगाचे जॅकेट घालून प्रचार करीत असतानाच आता त्यांच्या पक्षाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी रोहित पवार यांच्यावरच तोफ डागली आहे. ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा काकूंना उभ करण्यात आलं होतं. तसेच माझ्या मतदारसंघातही पवार कुटुंबातील व्यक्तीला उभ करणार आहेत असे शरद पवार गटाचे नेते रोहित पवार म्हणाले होते.याला पक्षातील ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी उत्तर दिले आहे.

आम्ही उमेदवार देणार नाही तर का पूजा करणार का ? असा सवाल करतानाच तुम्ही आमच्या वहिनींना पाडलं आता आम्हीही तुम्हाला पाडणार हे सहाजिकच आहे.. असे जोरदार उत्तर आत्राम यांनी रोहित पवार यांना दिले आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात यायला सुरुवात झालेली आहे.यावर सुप्रिया सुळे यांनी “महिलांनो लवकर पैसे काढून घ्या नाहीतर हे सरकार तुमचे पैसे परत घेऊन टाकेल” असे वक्तव्यं केले होते.यावर धर्मरावबाबा आत्राम यांना विचारले असता खोटं-नाट बोलण्याचं त्याचं काम आहे. कोणीही पैसे परत घेणार नाही. त्या वरिष्ठ नेत्या आहेत. त्यांना काय बोलायचे ते बोलतील. आम्ही जो निर्णय घेतला आहे तो पाळत आहोत ते महत्त्वाचं आहे असेही आत्राम म्हणाले.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी अजित पवार यांना अनफिट असल्याचे म्हटले होते. यावर धर्मरावबाबा आत्राम यांना विचारले असता त्यांनी अजित पवार फिट आहेत की अन फिट आहेत हे सर्वांना दिसत आहे.आम्ही इतक्या योजना काढल्या आहेत की त्याच्यामुळे विरोधक हे मागे गेले आहेत असेही आत्राम यावेळी म्हणाले.भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलिसांना जाहीर धमकी दिली होती. आम्हाला अडवाल तर तुमची बदली अशा ठिकाणी बदली करेल की तुमच्या बायकोचाही फोनही लागणार नाही, असे जाहीरपण नितेश राणे म्हणाले होते. यावर आत्राम यांनी नितेश राणे यांना सल्ला दिला आहे. त्यांनी मर्यादेत राहुन बोलायला पाहिजे, तसेच कुणावरही बोलताना दोनदा विचार करायला पाहिजे. आपण बोलल्यानंतर अडचणीत येतो.आमच्या पक्षाचे असेल किंवा विरोधक असेल त्यांनी बोलताना सन्मानाने बोलायला पाहिजे असेही धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.

मुख्यमंत्री आणि अजितदादात काही भांडण नाही

कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फाईलवरून वाद झाल्याचे वृत्त आले होते. त्यावर धर्मरामबाबा आत्राम यांना विचारले असता तशी काही भानगड नाही आहे. महायुतीत सगळं बरोबर सुरू असून आम्ही 200 च्यावर जागा जिंकणार असाही विश्वास आत्राम यांनी व्यक्त केला.