पुणे | 17 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह आता अजितदादा पवार यांच्या गटाला मिळाल्याने राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगापाठोपाठ आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर झाली असून त्यात अजित पवार यांचाच गट राष्ट्रवादी कॉंग्रेस असल्याचा निकाल आला आहे. आता शरद पवार यांना नव्या निवडणूक चिन्हाने निवडणूकांना सामोरे जावे लागणार आहे. निवडणूक चिन्ह महत्वाचे नसून पक्षाचे विचार महत्वाचे असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. आपण वेगवेगळ्या निवडणूक चिन्हांवर आतापर्यंत निवडणूका लढल्या असून त्यात विजय मिळविल्याचे पवार यांनी म्हटले आहे. आता शरद पवार यांचे नातू रोहीत पवार यांनी आपले काका अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पाडण्यात भाजपा सरकार यशस्वी झाले आहे. त्यामुळे दोन्ही मुळ पक्षांना फटका बसला असून त्यांना पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी आपले काका अजितदादा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अजितदादा पवार यांना तुरुंगात जावे लागू म्हणून ते भाजपासोबत गेले आहे. अजित पवारांचं घ्या किंवा इतर सर्व नेत्यांचे घ्या त्यांच्यावर काय-काय कारवाया झाल्या हे सर्वांना माहीत आहे. त्यांना जेलमध्ये जाण्याची भीती होती असेही आमदार रोहीत पवार यांनी म्हटले आहे. ते आळंदी बोलत होते. भाजपासोबत जाण्यासाठी मलाही काही ऑफर असतील ना ? असं सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केलेय. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी 84 वर्षाचे शरद पवार लढत आहेत. मग आपण पळून जाऊन कसे चालेल, मराठी माणूस हा कधी पळून जात नाही. हे आपण ऐकलं आणि पाहिलं आहे. आम्ही देखील जेलला घाबरत नाही. कारण आम्ही काही चुकीचं केलंच नाही, असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
आता 21 तारखेला आंबेगावमधील पवार साहेबांच्या सभेत जर मला संधी दिली तर मी बोलेल असेही आमदार रोहीत पवार यांनी सांगितले. शरद पवार साहेबांच्या 21 तारखेच्या सभेची जोरदार तयारी केली आहे. अनेकांचे फोन तुम्हाला येतील सभेला अजिबात जाऊ नका अशा धमक्या दिल्या जातील. तुमचा ऊस नेणार नाही, सोसायटीमधून कर्ज देणार नाही, तेव्हा सावध रहा असे रोहीत पवार यांनी सांगितले. भाजपच्या लोकांना काही देणंघेणं नाही. नेत्यांना संपविण्याचा काम भाजपा करत आहे. लोक ज्यांच्याबरोबर ती पार्टी टिकेल. पक्षाचा निकाल होईल, मात्र आपली पार्टी ही शेवटपर्यंत राहणार असल्याचे रोहीत पवार यांनी सांगितले.
बारामतीमध्ये काय होतं हे पाहू उमेदवार कोण देतं ते पाहू. बारामतीमध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर लढायला लागलं तरी आपली तयारी आहे. येत्या निवडणुकीत निकाल पवारसाहेबांच्या बाजूने लागलेला दिसेल. मराठी अस्मिता बाळासाहेबांनी केली आणि तीच पार्टी भाजपने फोडली. पवारसाहेब एवढ्या वयातही लढत आहेत त्याची कारणे वेगळी आहे. ही लढाई भाजपला सोपी झाली तर भाजपा महाराष्ट्राचे अस्तित्व ठेवणार नाहीत. 2024 ला भाजपा सत्तेत आले तर परिस्थिती बिकट होणार आहे. येथील माजी खासदाराला ( शिवाजीराव अढळराव ) कोणते तरी अध्यक्ष पद दिले आहे. आता हे लढत नाहीत. आता आमच्या कुटुंबातील एखादा शिरूरमध्ये यायला नको असाही टोलाही रोहीत पवार यांनी पार्थ पवार याचं नाव न घेता लगावला आहे.