माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार हे जातीजातीत भांडणं लावत आहेत. राज्यातील वातावरण शांत ठेवायचं सोडून वातावरण बिघडवत आहेत, अशी टीका करतानाच केवळ निवडणुकीसाठी हे सर्व सुरू आहे. शरद पवार निवडणुकीसाठी आटापिटा करत आहेत. पण अजितदादा पवार त्यांना सत्तेत येऊ देणार नाहीत, असा दावाच नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत हा दावा केला आहे.
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे. शरद पवार या वयातही महाराष्ट्र शांत, सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करत नाहीत. आजही वाद लावत आहेत. चारवेळा मुख्यमंत्री होते. केंद्रात मंत्री होते. तेव्हा आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी केली नाही. मराठा मुख्यमंत्री होता. का नाही दिलं आरक्षण? ही भांडणं तुम्हाला अभिप्रेत आहे का ? लोकांची मनं का पेटवत आहात? का नाही एखादा शांततेचा मोर्चा काढल? चला आपण चांगला पुतळा उभा करू असं तुम्ही का म्हटलं नाही? असं म्हटलं असतं तर तुमची कीर्ती वाढली असती, असं नारायण राणे म्हणाले.
शरद पवार, तुमच्या प्रत्येक राजकारणात संशय आहे. आज वयाच्या 83व्या वर्षीही तुम्ही मराठा समाजाला न्याय देऊ शकला नाही. तुम्ही आज केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवत आहात. पण अजितदादा काही तुम्हाला सत्तेत येऊ देणार नाही, असा चिमटा नारायण राणे यांनी काढला.
मनोज जरांगे यांचं आंदोलन होतं. त्यावेळी मला एक फोन आला. फोनवरून शिव्या देत होता कुणी तरी. मी म्हटलं, मी येतो तुझ्या घरी. मला पत्ता दे. त्याने दिला नाही. मग मी माझ्या पीएला त्याचा पत्ता काढायला सांगितलं. तो शरद पवार यांचा माणूस निघाला. हे खेळ वरिष्ठ खेळत आहेत. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र चांगला असावा हे पवारांचं ध्येय असायला हवं होतं. पण पेट्रोल टाकून फिरायचं आणि काडी घेऊन फिरायचं याला स्थान नाही, असं राणे म्हणाले.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे यांनी भ्रष्टाचारावर बोलूच नये. आम्ही हाताने पैसे दिले. मातोश्रीत दिले. कधी रसिट दिली नाही. आणि हे भ्रष्टाचारावर बोलत आहेत. ते कधीच मुख्यमंत्री होणार नाही. तेव्हा शरद पवार यांनी त्यांना मुख्यमंत्री केलं. अभ्यास नाही, कायदा आणि सुव्यवस्था कशी हाताळतात ते माहीत नाही, असा हल्लाच राणेंनी चढवला. संजय राऊत आग लाव्या आहे. पेट्रोल घेऊनच फिरतो. कोण नसतानाच आग लावतो. कोण असताना करत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी भ्रष्टाचाराच्या गमजा मारू नयेत. त्यांची गाडी आणि कपडालत्ताही भ्रष्टाचारातूनच आहे. आमच्याकडे एखादी वस्तू बघितली की लगेच मागायचे. आम्ही फॉरेनमधून आणून घड्याळ दिलं नसेल अशी एकही आमची फॉरेन टूर नव्हती, असा हल्लाही त्यांनी चढवला.