नवी दिल्लीः गुजरातच्या मोरबी (Gujrat Morbi) येथील पूल कोसळल्याची सर्वात दुःखदायक घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेत १३५ जणांचा हकनाक बळी गेला. या घटनेनंतर पुलाची दुरुस्ती आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यासोबतच असाही विचार झाला की, देशात कुठेही एखादा पूल (Bridge) कोसळणार असेल तर त्याचं अलर्ट (Alert) आधीच मिळालं तर? अशी एखादी यंत्रणा उभी राहिली तर? ही योजना अनेक दुर्घटना टाळणारी ठरेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे असा मेगाप्लॅन आहे.
केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच या मेगाप्लॅनविषयी माहिती दिली. ते म्हणाले, मी ऑस्ट्रेलिय आणि इतर देशांतील अशा यंत्रणांचा अभ्यास केला.
नाशिकमध्येही आपल्या काही शास्त्रज्ञांनी संशोधन केलंय. देशातील सर्वच पूल एका सिस्टिमद्वारे जोडले जातील. ही यंत्रणा दिल्लीतील एका कंप्यूटरला जोडली जाईल. जेणेकरून एखाद्या पुलात बिघाड झाला असेल तर त्याची सूचना दिल्लीतल्या कंप्यूटरला आधीच मिळेल.
एका न्यूच चॅनलला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही 80 हजार पूलांचा रेकॉर्ड गोळा केलाय. अजून 3 ते 4 लाख पूलांचा रेकॉर्ड घ्यायचाय.
एखाद्या पूलात काही बिघाड झाला तर तत्काळ अलार्म वाजेल. कंप्यूटरद्वारे राज्य सरकार आणि स्थानिक नगरपरिषदांना माहिती दिली जाईल.
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीरसारख्या डोंगर-दऱ्यांच्या भागातही आम्ही वेगळे प्लॅन करत आहोत, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. डोंगराळ भागात अशी रेल्वे लाइन असेल, जिथे वरील भागात रेल्वेचे डबे असतील आणि खालच्या भागात शेळ्या-मेंढ्या, जनावरं, भाज्या-फळं- फुलं असतील. अशा प्रवासाला 4 तासांऐवजी 20 मिनिटच लागतील.
अशा योजनेसाठी इंधन कमी लागेल, त्यामुळे खर्चही कमी येईल. लडाखमध्ये याचा पायलट प्रोजेक्ट होईल. एक डोंगर दुसऱ्या डोंगराला जोडण्यासाठी केबल नेटवर्कचा वापर केला जाईल.