सत्ता, शहाणपण आणि राऊतांचा एक कप चहा, वाचा शिवसेनेतल्याच ट्रिगर पॉईंटबद्दल सविस्तर

| Updated on: Mar 21, 2021 | 7:12 PM

परमबीरसिंग यांनी सरकारवर एवढे गंभीर आरोप केलेत, त्याची माहिती राऊतांना नसेल यावर विश्वास ठेवता येईल? ते सरकारचा भाग नसल्याचं पुन्हा पुन्हा का सांगतात? (sanjay raut parambir singh)

सत्ता, शहाणपण आणि राऊतांचा एक कप चहा, वाचा शिवसेनेतल्याच ट्रिगर पॉईंटबद्दल सविस्तर
sanjay raut
Follow us on

मुंबई : एखादा नेता रोज बोलायला लागला, त्यातही दिवसातून तो दोन तीन वेळा बोलायला लागला तर कधी कधी तो जे काही महत्वाचं बोलतोय ते काहीसं नजरेआड होण्याची शक्यता असते. परमबीर सिंगांचं (Parambir Singh) लेटर, त्यांनी केलेले आरोप यावरुन सध्या जे वादळ उठलेलं आहे, त्यावर राऊत काय बोलणार याची उत्सुकता होतीच. काल रात्री ते नाशकात होते. तिथं पत्रकारांनी त्यांना गाठलं तर ते संतापात तर होतेच पण मला काहीच माहित नाही म्हणत निघूनही गेले. एवढच नाही तर सरकारचे लोक बोलतील असही म्हणाले. परमबीरसिंग यांनी सरकारवर एवढे गंभीर आरोप केलेत, त्याची माहिती राऊतांना ( Sanjay Raut) नसेल यावर विश्वास ठेवता येईल? ते सरकारचा भाग नसल्याचं पुन्हा पुन्हा का सांगतात? (All is not well in Shivsena, Detail analysis of Sanjay Raut Statement)

कुणाचे पाय जमीनीवर नाहीत?

आज पुन्हा सकाळी राऊतांना पत्रकारांनी नाशकातच गाठलं. यावेळेस मात्र ते सविस्तर बोलले. एखाद्या राजकीय नेत्यापेक्षा त्यांच्यातला संपादक जास्त जागा आहे असही वाटत होतं. राऊत जे काही बोललेत ते फक्त अनिल देशमुखच नाही तर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आरसा दाखवणारं आहे. त्यांची काही वक्तव्य बघा- या सरकारमधल्या प्रत्येकानं नक्कीच आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे, प्रत्येक घटकानं आत्मपरिक्षण करणं गरजेचं आहे, सरकारमधल्या प्रत्येकानं आपले पाय जमीनीवर आहेत का हे तपासून पहाणं गरजेचं आहे. राऊतांची ही भूमिका स्फोटक आहे. ते खुद्द सरकारमधल्या घटकांना आत्मपरिक्षण करायला तर सांगत आहेतच पण सरळ सरळ मुख्यमंत्र्यांनाही पाय जमीनीवर आहेत का हे तपासून पहा म्हणतायत. कारण ह्या सरकारचे मुख्य उद्धव ठाकरे आहेत. त्यांना वगळून ‘पाय’ कसे तपासता येतील?

सत्तेपुढं शहाणपण चालत नाही!

राऊत एवढ्यावरच थांबलेले नाहीत. त्याच पाच सात मिनिटाच्या पत्रकारांसोबतच्या संवादात त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरही ‘पण’ निर्माण केला. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला असं ते म्हणाले पण पुढे ‘पण’ जोडत अधिकाऱ्यांवर वेळेतच नियंत्रण ठेवण्यात खुद्द मुख्यमंत्री अपयशी ठरले किंवा कमी पडले हेही  सांगायला ते विसरले नाहीत. हे कमी म्हणून की काय पुढच्याच वाक्यात राऊत म्हणाले की, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. या वाक्यानंतर मात्र राऊत काहीसे सावध वाटले. त्यांनी लगेच जोडलं की, मी जगभराबद्दल बोलतो आहे. सत्तेवर बसलेल्यांना असं वाटत असतं की, मीच शहाणा आहे पण तसं ते नसतं हे आता ह्या प्रकरणात कळालं असेल असं म्हणून राऊत चालते झाले. राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या शहाणपणावर थेट प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचं उघडउघड दिसतं आहे.

वेळीच अधिकाऱ्यावर नियंत्रण नाही!

उद्धव ठाकरे यांची प्रशासनावर पकड नाही, अधिकारी अजूनही फडणवीसांच्याच ऐकण्यात आहेत अशी चर्चा रोज ऐकायला येते. त्यात काहीसं तथ्यही दिसतय. ज्याप्रमाणं मनसुख हिरेन प्रकरणात फडणवीसांनी सीडीआर मिळवला, त्यानं प्रशासनावर कुणाची पकड आहे ते कळालेलच आहे. पण मुंबईसारख्या शहराच्या पोलीस आयुक्तपदी राहीलेल्या व्यक्तीनं थेट गृहमंत्र्यावर वसुलीपणाचा आरोप केला, त्यावरुनही मुख्यमंत्र्यांची प्रशासनावर पकड नाही हेच सिद्ध होतं ना? राऊत तेच तर सांगतायत ना? बरं खुद्द परमबीरसिंग यांनी देशमुखांच्या वसुलीबद्दल उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं असं पत्रात लिहिलेलं आहे. मग त्यावर मुख्यमंत्र्यांनी का भूमिका घेतली नाही? राऊत मुख्यमंत्र्यांच्या याच ‘सैल’पणावर बोट ठेवताना दिसतायत.

शिंतोडे आणि राऊतांचा मोठेपणा

शिवसेनेच्या दोन नेत्यांचं म्हणा की मंत्र्यांचं म्हणा नाव चर्चेत असतं. संजय राठोड प्रकरणात एकनाथ शिंदे सक्रिय होते असं ऐकायला येत होतं तर अनिल परब हे गृह खात्यात थेट हस्तक्षेप करतात असा राष्ट्रवादीचा थेट आरोप आहे. हे दोन्ही मंत्री मुख्यमंत्र्याच्या डाव्या उजव्या बाजुचे मानले जातात. सुभाष देसाईंचं नाव आता फार चर्चेत येत नाही. राऊत उघडउघड शिंदे परब यांच्याबद्दल नाराज आहेत असं म्हणता येईल? वाझे प्रकरणात आणि आता परमबीरसिंगाच्या पत्रानं सरकारवर शिंतोडे उडाले याची कबुली राऊतांनी दिलीय. तेवढा मोठेपणा त्यांच्याकडे असल्याचही राऊत म्हणाले. हा मोठेपणा शिंदे, परब ह्या मंत्र्यांकडे नाही असं सांगण्याचा राऊत प्रयत्न करतायत? की थेट मुख्यमंत्र्यांकडेही तो नाही असं सुचित करण्याचा प्रयत्न करतायत?

एक कप चहात ओशाळलो नाही

राऊतांची भूमिका ‘हे असं व्हायला हवं ते तसं व्हायला हवं’ अशा वाक्यात आहे. वेळोवेळी ते आपण सरकारचा भाग नसल्याचही सांगतात. राऊतांची अशी भूमिका म्हणजे सरकारमध्ये त्यांच्या म्हणण्याला काही किंमत नाही किंवा त्यासाठी त्यांना झगडावं लागतं असं दिसतं. नाशकात आज ते ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस उद्विग्न वाटले. एक वेळेस ते म्हणाले की, हे सरकार आणण्यामध्ये आमच्यासारख्यांचा जो खारीचा वाटा आहे, त्यांच्यासाठी हे धक्कादायक आहेत असे आरोप होणं. एवढच नाही तर पुढं नैतिकतेचा आरसा दाखवण्यासाठी राऊतांनी आपण सरकारच्या चार आण्यात किंवा एक कप चहात मिंधे नसल्याचेही सांगितलं.

एक गोष्ट निश्चित. परमबीरसिंग यांच्या आरोपानं फक्त तीन पक्षांच्या सरकारमध्येच नाही तर त्या त्या पक्षांमध्येही काही आलबेल नाही हे दिसतं. विशेषत: आधी राठोड प्रकरण, त्यानंतर वाझे आणि नंतर परमबीरसिंग. सरकार वावटळीत सापडलं आहे हे खरंच आहे पण शिवसेनेतही सारं काही सुरळीत आहे असं म्हणता येणार नाही. तसं असतं तर राऊत एक कप चहात मिंधा नाही असं म्हणाले असते का?

इतर बातम्या :

Parambir Singh Letter : दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी बैठकांवर बैठका, राऊत, पटेल, अजितदादा आणि जयंत पाटलांचीही हजेरी!

Parambir Singh Letter Live Updates | ठाण्यात भाजपचे आंदोलन, देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

(All is not well in Shivsena, Detail analysis of Sanjay Raut Statement)