चंद्रपूर | 6 डिसेंबर 2023 : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या अधिवेशनात अनेक विषयावर चर्चा होणार आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या फुटीनंतरचं हे पहिलंच हिवाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांच्या समोर आलेले उद्यापासून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही गटात खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे अजितदादा गटाच्या सर्व आमदारांची अडचण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. अजितदादा गटाच्या आमदारांना व्हीप काढला जाणार आहे का?, असा सवाल अनिल देशमुख यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी मोठं विधान केलं आहे. मागच्या अधिवेशनावेळी अजितदादा गटाचे आमदार कामकाजात सहभागी झाले नाहीत. केवळ लॉबीत फिरत होते. त्यामुळे त्यांना शरद पवार यांच्याकडे जाण्यात रस आहे हे स्पष्ट होते. पुढच्या काळात या सर्वांची घर वापसी बघायला मिळेल, असं सांगतानाच या अधिवेशनात व्हीप काढायचीच वेळ आली तर तो नक्की काढू. काही अडचण नाही, असं सूचक विधान अनिल देशमुख यांनी केलं आहे. देशमुख यांच्या म्हणण्यानुसार अजितदादा गटाच्या आमदारांना व्हीप पाठवल्यास त्यांच्यावर आता कारवाई होणार नाही. मात्र, कायदेशीर लढाईत हा व्हीप महत्त्वाचा ठरेल. तेव्हा मात्र, अजितदादा गटाच्या आमदारांची अडचण वाढू शकते, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.
अजितदादा गटाचे आमदार द्विधा मनस्थितीत असल्याचा दावाही अनिल देशमुख यांनी केला. अजित पवार गटाचे आमदार द्विधा मनस्थितीत आहेत. या सरकारकडून आपल्या मतदारसंघातील जेवढी शक्य असेल तेवढी कामे काढून घ्यायची आणि नंतर परत शरद पवारांकडे यायचे असा विचार करत आहेत. खूप मोठ्या संख्येत आमदार घर वापसी करतील, असा दावा देशमुख यांनी केला आहे.
येत्या 12 डिसेंबर रोजी नागपूर येथे संघर्ष यात्रेचा समारोप होणार असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे 12 डिसेंबर रोजी नागपूरला येतील. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थीतीत झिरोमाईल येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये आमदार रोहीत पवार यांच्या 800 किलोमीटरच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप होणार आहे. या सभेला पाहुणे म्हणुन मित्र पक्षाचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंहही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, अनिल देशमुख, अजय चौधरी उपस्थित राहणार आहेत. चहापानाच्या आधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा होणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.