Explainer : 5 राज्यांमधील जागावाटप कठीण, I.N.D.I.A. आघाडीपुढील आव्हाने काय

| Updated on: Dec 21, 2023 | 2:58 PM

इंडिया आघाडीमध्ये प्रादेशिक पक्षांचा अधिक भरणा आहे. त्या त्या राज्यात ते ते पक्ष अधिक प्रबळ आहेत. याच प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी जागावाटपाबाबत तेच अंतिम निर्णय घेतील असे सांगून अडचण निर्माण केलीय.

Explainer : 5 राज्यांमधील जागावाटप कठीण, I.N.D.I.A. आघाडीपुढील आव्हाने काय
INDIA AGHADI
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली | 20 डिसेंबर 2023 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी तीन महिन्यांहून अधिक काळ उरलेला नाही. मे 2024 च्या अखेरीस लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईल असे संकेत मिळत आहेत. केंद्रात सरकार चालवण्यासाठीचा जनादेश इंडिया आघाडीला मिळणार की पुन्हा मोदी सरकार येणार याचा फैसला होणार आहे. देशात सद्यस्थितीत सर्वात मोठा बलाढ्य पक्ष भाजप आणि पंतप्रधान मोदी यांना पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसने कामाबर कसली आहे. त्यासाठी छोट्या मोठ्या पक्षांची एकत्र मोट बांधून इंडिया आघाडीची घोषणा केली. मात्र, याच इंडिया आघाडीसमोर जागावाटपाचे मोठे आव्हान असणार आहे. त्यात सर्वाधिक अडचण होणार आहे ती काँग्रेसची…

इंडिया आघाडीसमोर आव्हान काय?

इंडिया आघाडीचा मुख्य समन्वयक कोण हे अद्याप निश्चित झालेले नाही. भाजपकडे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदी हा चेहरा आहे. मात्र, इंडिया आघाडीकडे त्याचा अभाव दिसत आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीमुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसच्या पराभवामुळे इंडिया आघाडीत चिंतेचे वातावरण आहे. त्यात जागावाटपाबाबत केवळ आश्वासनच दिले जात असल्याने नेते चिंतेत आहेत. तृणमूलचा नेत्या ममता बॅनर्जी यांनी ३१ डिसेंबरपर्यंत जागावाटपाचा मुद्दा सोडवण्याचा सल्ला दिलाय.

उत्तर प्रदेशमध्ये काय होणार?

लोकसभेत सर्वाधिक जागा या उत्तर प्रदेशमधून निवडून येतात. त्या खालोखाल महाराष्ट्राचा नंबर आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांवर इंडिया आघाडीची प्रमुख भिस्त असणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांनी 80 जागांवर भाजपचा पराभव करण्याचा संकल्प केलाय. मात्र. त्यासाठी यूपीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला आपणच ठरवू. त्यावर एकमत झाल्यावरच युती शक्य होईल असे स्पष्ट केलेय.

महाराष्ट्रातही शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) आणि कॉंगेस यांनी किमान 30 जागा निवडून आणण्याचा दावा केलाय. परंतु इथेही जागावाटपाचे घोडे अडले आहे. दिल्लीतील अरविंद केजरीवाल ते बिहारमधील तेजस्वी यादव सर्वजण जागावाटपाच्या फोर्मुल्याची वाट पहात आहेत.

INDIA आघाडीच्या बैठकीमधून जय काही बातम्या समोर आल्या त्यामधून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सर्वाधिक आक्रमक असल्याचे दिसून आले. मल्लिकार्जुन खर्गे यांचा पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रस्ताव असो किंवा बनारसमधून प्रियांका गांधी वाड्रा यांना पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा सल्ला असो अशा अनेक सूचना ममता बॅनर्जीं यांनी दिल्या आहेत.

त्याचवेळी त्यांनी जागावाटपाची कालमर्यादा निश्चित करून ती पाळली तरच उद्दिष्ट साध्य करता येईल. अन्यथा इंडिया आघाडीला त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळेच राज्य पातळीवरील जागावाटप डिसेंबर अखेरीस किंवा कोणत्याही परिस्थितीत जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत निश्चित केले जावे यावर नेत्यांचे एकमत झाले.

पाच राज्यांमध्ये जागावाटपाचा प्रश्न

उत्तर प्रदेशसारख्या राज्यात काँग्रेसने दोन पावले मागे राहावे. तेहे अखिलेश यादव यांनी आघाडीचे नेतृत्व करावे असा सल्ला देण्यात आला आहे. पश्‍चिम बंगालसाठी ममता बॅनर्जीं यांनी तेथे केवळ तृणमूल काँग्रेसच आघाडी करेल असे स्पष्ट केलेय. येथे टीएमसी, काँग्रेस आणि डावी आघाडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथे जागावाटपाचा फॉर्म्युला त्याच ठरवतील. दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार आहे. त्यामुळे या दोन राज्यात अरविंद केजरीवाल यांनीही अंतिम जागावाटप आपणच करू असे म्हटलेय.

इकडे महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्वाची मानली जाणार आहे. तर बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनीही आपला दावा सांगितला आहे. प्रादेशिक पक्ष खूप मजबूत आहेत आणि इंडिया आघाडीत प्रत्येकजण आपली भूमिका बजावेल असे सांगत तेजस्वी यादव यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत. त्यामुळे प्रादेशिक पक्षांपेक्षा कॉंग्रेसचीच जागावाटपवरून कोंडी होणार आहे असे चित्र सध्या तरी दिसत आहे.