औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत जाहीर सभा होणार आहे. राज ठाकरे यांनी उचलून धरलेला मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसाचा मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण पेटलं आहे. अशावेळी राज ठाकरे यांच्या उद्याच्या सभेकडे संपूर्ण राजकीय विश्वाचं लक्ष लागलं आहे. अशावेळी आज राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आज सकाळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जात सभा स्थळाची पाहणी केली. त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना पोलिसांनी सभेसाठी घातलेल्या अटींबाबत प्रश्न विचारला. त्यावर अमित ठाकरे यांनी आक्रमक भूमिका स्पष्ट करत आम्ही केसेस घ्यायलाही तयार आहोत, असं वक्तव्य केलंय. अमित ठाकरे यांच्या याच वक्तव्यावरुन शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी जोरदार पलटवार केलाय. मनसेच्या टोल आंदोलनावेळी मनसे कार्यकर्त्यावर पडलेल्या केसेस आणि त्यात त्यांचे झालेले हाल दाखवणारा एक व्हिडीओच दानवे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केलाय.
शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी अमित ठाकरे यांच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार केलाय. आम्ही केसेस घ्यायलाही तयार आहोत, असं वक्तव्य अमित ठाकरे यांनी केलं होतं. त्यावर आता अंबादास दानवे यांनी एक जुना व्हिडीओ पोस्ट करत ‘फक्त कार्यकर्ते जेलमध्ये जाणार. तुम्ही निव्वळ राजकारण करणार, शेवटी राजकारण तुमच्या पोटापाण्याचा व्यवसाय आहे’, अशी घणाघाती टीका यांनी केली आहे. लाव रे तो व्हीडिओ म्हणून त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केलाय.
मनसेच्या टोलनाक्यांविरोधात आंदोलनात राज ठाकरे यांच्या आदेशानंतर हजारो मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी त्यांनी राज्यभरातील टोलनाके फोडले. औरंगाबादेतही टोलविरोधात आंदोलन झालं. त्यात मनसे कार्यकर्ता श्रीकांत ढगे याला अटक झाली होती. मात्र, त्याचा जामीन घेण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही. मनसेच्या स्थानिक नेत्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे श्रीकांतच्या आईला आपले दागिने विकून पोराच्या जामिनासाठी पैशाची व्यवस्था करावी लागली होती. त्यानंतर श्रीकांत ढगे यांनी पक्षाच्या नेत्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत राजकारणाला राम राम केला होता, त्याच श्रीकांत ढगेबाबत एका वृत्तवाहिनीने केलेल्या बातमीचा व्हिडीओ अंबादास दानवे यांनी पोस्ट करत अमित ठाकरेंवर निशाणा साधलाय.