औरंगाबाद : पाणी प्रश्नावरुन औरंगाबाद (Aurangabad) शहरातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपचा जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येनं भाजप कार्यकर्ते (BJP Party Workers) आणि नागरिक सहभागी झाले. रिकाम्या घागरी आणि हंडे घेऊन मोर्चात सहभागी महिलांची संख्याही मोठी राहिली. मात्र, एजन्सीला पैसे देऊन भाजपनं मोर्चासाठी लोक आणल्याचा आरोप शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलाय. त्याबाबत एक व्हिडीओही त्यांनी माध्यमांना दिला आहे. ‘भाजपच्या वल्गना फोल ठरल्या. एजन्सीला पैसे देऊन भाजपनं लोकं आणली. समांतरला भाजपच्याच लोकांनी विरोध केला’, असा दावाही अंबादास दानवे यांनी केलाय.
‘देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या बाहेर कधी विचार केला नाही. मराठवाड्यावरुन पुतना मानवशीचं प्रेम बघायला मिळालं. काही योजना भाजपनं कार्यकर्ते पोसायला तयार केल्या होत्या, त्या आम्बही बंद केल्या. 2 हजार 600 कोटी रुपयाचा निधी महाविकास आघाडी सरकारनं शहरासाठी दिला आहे, असा दावाही त्यांनी केलाय. तसंच शिवसेनेचं वर्चस्व औरंगाबाद शहरावरच नाही तर जिल्ह्यावर राहिलं आहे. त्यामुळे एमआयएमकडे लक्ष देण्याची गरज नाही. रावसाहेब दानवे हे शिवसेनेच्या मतांमुळे खुर्चीवर असल्याचंही अंबादास दानवे यांनी म्हटलंय.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाजपच्या जल आक्रोश मोर्चावर निशाणा साधला. भाजपला जल आक्रोश मोर्चा हा मोर्चा होता की एखादा इव्हेंट? मोर्चात फुगड्या, उंट कशासाठी? मोर्चात गांभीर्य हवं. मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांसमोर हे विषय मांडले असले तरी चाललं असतं, मोर्चाची गरज काय? असा सवाल राऊत यांनी केलाय. मुख्यमंत्री संभाजीनगरच्या सभेत उत्तर देतील, असा सूचक इशाराही त्यांनी दिलाय.
एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवलाय. आता औरंगाबादकरांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची वेळ आली आहे. भाजपने गोर गरीबांना हंडे देण्याचं आश्वासन दिलं होतं, आज त्यांनी हंडे वाटले. या मोर्चात एक आजी तिला हंडा मिळाला म्हणून नाचत होती. हंड्यावर त्यांचे नाव, फोटो होते. लोकांनी हंड्यांचं आमिश दाखवून बोलावलं होतं, असा आरोप जलील यांनी केलाय. तसंच फडणवीस म्हणाले की महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा झालीय. मग 30 वर्षे तुम्ही सत्तेत होता. तुमचे लोक शिवसेनेसोबत सत्तेत होते. त्यावेळी तुम्ही काय गोट्या खेळत होता का? तुम्ही कारवाई का केली नाही? तुम्ही मुख्यमंत्री असून कुणाला निलंबीत केलं का? असा सवालही जलील यांनी विचारला.