औरंगाबाद : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून (Shiv sena) बंडखोरी करत सरकार स्थापन केले. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी हे शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेला गळती लागल्याने ही गळती रोखण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर आहे. मात्र आता ही गळती थांबवून पुन्हा एकदा शिवसेनेला उभारी देण्याच्या इराद्याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे मैदानात उतरले आहेत. त्यांनी शिवसेनेतून फुटून शिंदे गटात सामील झालेल्या अब्दुल सत्तारांवर जोरदार निशाणा साधला होता. हिंमत असेल तर अब्दुल सत्तार यांनी पुन्हा निवडणूक लढवावी असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी देखील आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना जर मला एकनाथ शिंदे यांचा आदेश आला तर मी पुन्हा निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे म्हटले होते. आता या सर्व प्रकरणावर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अंबादास दानवे यांनी शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांवर जोरदार निशाणा साधला आहे. तुम्ही कितीही शक्तिप्रदर्शन करा, मात्र गद्दारीचा डाग कायम राहणार आहे. तो काधीही पुसला जाणार नसल्याची टीका दानवे यांनी केली आहे. दरम्यान त्यांनी यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर देखील टीका केली आहे. सत्तार यांना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी विधानसभेचं तिकिट दिलं. शिवसेनेतून निवडणूक लढून ते आमदार बनले. त्यामुळे त्यांनी आता आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवून दाखवावी असे थेट आव्हानच दानवे यांनी सत्तारांना केले आहे.
आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना पुन्हा एकदा निवडणूक लढवावी आणि निवडून येऊन दाखवावे असे आव्हान केले होते. या टीकेला अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी माझ्या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवण्यास तयार आहे. फक्त एकनाथ शिंदे यांचा आदेश आला पाहिजे, त्यांचा आदेश आला की मी सदस्यत्वाचा राजीनामा देऊन निवडणूक लढवेन असे सत्तार यांनी म्हटले होते.