मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यासाठी (NCP Leader) धोक्याची घंटा असल्याचं ट्विट करणारे मोहित कंबोज (Mohit Kamboj) हे काय ईडीचे ऑफिसर आहेत का, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलाय. भाजप नेते मोहित कंबोज यांचं एक ट्विट आज सकाळपासून राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिसऱ्या नेत्याचा नंबर लागणार, अशा आशयाचं हे ट्विट आहे. कंबोज यांचा रोख अजित पवार यांच्याकडे असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र ईडी किंवा इतर तपास यंत्रणांनी कारवाई अथवा चौकशी करण्यापूर्वीच भाजप नेत्याने अशा प्रकारे ट्विट केल्यावरून महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी भाजपविरोधात हल्लाबोल केलाय.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोहित कंबोज यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ईडीची भीती वारंवार दाखवली जाते. याआधीही मोहित कंबोज यांनी 1 जून तुम्हारा है… 30 जून हमारा है… असं ट्विट केलं होतं. आता त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात ट्विट केलंय. मोहित कंबोज काय ईडीचा ऑफिसर आहे का? भाजपचा कुणी एक साधा नेता असं म्हणतोय, याचा अर्थ केंद्रीय तपास यंत्रणा भारतीय जनता पार्टीच्या बटीक झालेल्या आहेत. भाजपने सर्व यंत्रणांना ताब्यात ठेवलंय, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.
1:- Anil Deshmukh
2:- Nawab Malik
3:- Sanjay Panday
4:- Sanjay Raut
5:- ____________अपना 100% Strike Rate Hai !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 17, 2022
महाराष्ट्रातील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. आजपासून 25 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालेल. मात्र अधिवेशनाच्या सकाळीच भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याविरोधात एक ट्विट केलंय. लवकरच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिसऱ्या नेत्याचा नंबर आहे, असं त्यात म्हटलंय. तसेच या विषयी सविस्तर बोलण्यासाठी आपण लवकरच एक पत्रकार परिषद घेणार असल्याचंही एक ट्विट कंबोज यांनी केलंय. त्यामुळे भाजपच्या तपासयंत्रणांची सुई आता कुणाकडे फिरतेय, यावरून अधिवेशनाच्या दिवशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांची चौकशी होऊ शकते, अशी शक्यता राजकीय गोटातून वर्तवली जातेय. पण तपास यंत्रणा कुणावर धाड टाकणार, कुणावर कारवाई करणार हे भाजप नेत्यांना कसे कळते? यावरून ईडीची विश्वासार्हता काय? असा सवाल सामान्यांपासून विरोधी पक्षनेतेही विचारत आहेत.