मुंबई : मेट्रोचं कारशेड बनवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरे जंगलातील (save aarey) 2700 झाडं तोडण्याचा (Aarey Metro Car shed) निर्णय घेतला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी ‘आरे वाचवा’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी आज मुंबईतील सामाजिक संस्थांनी आझाद मैदानात आंदोलन केले. या आंदोलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही सहभागी झाल्या होत्या. दरम्यान या निमित्ताने का होईना ठाकरेंच्या पुढील पिढीत युती झाली आहे.
यापूर्वी आरेतील वृक्षतोड थांबवण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे. त्यानंतर अमित ठाकरेंनी एका व्हिडीओद्वारे मेट्रो कारशेडसाठी आरेतील वृक्षतोड करु नये असे आवाहन प्रशासनला केलं होतं. दरम्यान नुकतंच आरे वाचवा या मोहीमेसाठी मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात सामाजिक संस्था, कॉलेजचे विद्यार्थी, स्थानिक नागरिकही सहभागी झाले होते. या सर्वांना पोस्टर, पथनाट्य अशा विविध माध्यामातून आरेतील वृक्षतोडीस विरोध दर्शवला.
आरे ला का रे करताना शिवसेना भाजप युतीमध्ये कोणताही तणाव नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम मेट्रो प्रोजेक्टला शिवसेनेने यापूर्वी पाठिंबा दर्शवला आहे. पण आरे कॉलनीत मेट्रोच्या कारशेड उभारण्यासाठी शिवसेनेचा विरोध आहे आणि तो कायम राहिल. असे मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं. तसेच आरेला विरोध करताना कोणताही राजकीय दबाव नाही असेही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं.
मात्र आरेच्या विषयावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “झाडांची कत्तल ही आम्हालाही मंजूर नाही, त्यातील बारकावे आदित्य ठाकरेंनी समजून घेतली पाहिजे. वृक्ष तोडीसाठी विरोध दर्शवणे ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे याप्रकरणी मी स्वत: आदित्य ठाकरेंशी चर्चा करेन”,असेही ते म्हणाले