मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचे आकडे एनडीए सरकारच्या बाजूने आल्यानंतर नवी दिल्लीत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी दिल्लीत बैठकीचं आयोजन केलंय. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे परदेशात असल्याने बैठकीत उपस्थित राहणार का? याबाबत शंका होती. पण अखेर अमित शाह यांच्या आग्रहानंतर उद्धव ठाकरे स्वतः बैठकीला जाणार आहेत.
शिवसेनेकडून सुभाष देसाई यांना बैठकीसाठी पाठवलं जाणार होतं. पण एनडीएच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे यांनीच यावं यासाठी अमित शाह यांनी ‘मातोश्री’ला तब्बल आठ वेळा फोन केले. त्यानंतर आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर दिल्लीला जाण्यासाठी चाटर्ड जेटमधून निघाले आहेत. दिल्ली विमानतळावर 6.30 वाजता उतरतील आणि 7.30 पर्यंत अशोका हॉटेलमध्ये पोहोचतील.
एक्झिट पोलच्या आकड्यांनंतर भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी दिल्लीतील भाजप कार्यालयात आज (21 मे) संध्याकाळी 7 वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये विशेष डिनरचंही आयोजन करण्यात आलंय. या बैठकीत भाजप, शिवसेना, जेडीयू, अण्णा द्रमुक, एआईएडीएमके, पीएमके, डीएमडीके, अकाली दल, लोजप, अपना दल, असम गण परिषद यांसह एनडीएतील इतर 40 घटक पक्षातील नेते सहभागी होणार आहेत.
दोन्ही कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यासह अनेक नेते हजर राहणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेशात फिरायला गेले होते. त्यामुळे ते या बैठकीला अनुपस्थितीत राहतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यांच्या अनुपस्थितीत शिवसेना नेते सुभाष देसाई किंवा अनंत गीते भाजपच्या बैठकीत सहभागी होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान आज (21 मे) दुपारच्या सुमारास ते मुंबईत परतले आहेत. त्यामुळे दिल्लीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या विशेष बैठकीला उद्धव ठाकरे हजर राहणार आहेत.