सिंधुदुर्ग : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सिंधुदुर्गमधील लाईफटाईम महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं वचन दिल्याचं ढळढळीत खोटं बोलत असल्याचाचही दावा शाह यांनी केला. मी बंद खोलीत राजकारण करणारा व्यक्ती नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडउघड करतो, असंही त्यांनी नमूद केलं (Amit Shah say CM Uddhav Thackeray lying about CM promise in Maharashtra).
अमित शाह म्हणाले, “मी आज महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगायला आलोय की तुम्ही जो जनादेश दिला होता त्या पवित्र जनादेशाचा अनादर करण्यात आला. एक अपवित्र आघाडी करुन सत्तेच्या लालसेपोटी येथे सरकार स्थापन झालं. जनादेश नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार स्थापन करण्याचा होता. ते म्हणतात आम्ही वचन तोडलं. आम्ही वचन पाळणारे लोक आहोत. आम्ही असं ढळढळीत खोटं बोलत नाही. बिहारमध्ये आम्ही नितीश कुमार यांच्या कमी जागा येऊनही ठरल्याप्रमाणे त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं. नितीश कुमार यांनी भाजपचा मुख्यमंत्री करा असं म्हटलं होतं तरी आम्ही शब्द पाळला. आज नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत.”
“उद्धव ठाकरे म्हणतात मी त्यांना एका बंद खोलीत वचन दिलं होतं. पण मी कधीही काहीही बंद खोलीत करत नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडउघड करतो. मी कधीही बंद खोलीचं राजकारण केलं नाहीये. मी जनतेत राहणारा व्यक्ती आहे. मी कधीही घाबरत नाही जे होतं ते मी सर्वांसमोर बोलतो. त्यांना असं कोणतंही वचन दिलं नव्हतं, हेच सांगायला मी इथं आलोय,” असंही अमित शाह म्हणाले.
‘वचन दिलं होतं तर मग प्रचारसभांमध्ये उद्धव ठाकरे का बोलले नाही?’
अमित शाह म्हणाले, “जर असं मानलं की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन दिलं होतं, तर मग शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या बॅनरवर तुमच्यापेक्षा दुप्पट मोठा फोटो नरेंद्र मोदींचा फोटो लागत होता. मोदींचा फोटो वापरुन निवडणूक लढली. माझ्यासोबत आणि मोदींसोबत तुमची रॅली झाली. प्रत्येक ठिकाणी आम्ही म्हटलं की एनडीएचं सरकार बनवा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. त्यावेळी उद्धव ठाकरे का बोलले नाही? असं कोणतंच बोलणं झालं नव्हतं. सत्तेच्या लालसेपोटी बाळासाहेब ठाकरेंच्या सर्व मुल्यांना तापी नदीत विसर्जित करुन ते सत्तेवर बसलेत.”
हेही वाचा :
बाळासाहेब ठाकरेंचे सर्व सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत; अमित शहांची उद्धव ठाकरेंवर थेट टीका
राणेंसारख्या नेत्यांना कसं सांभाळायचं आम्हाला माहीत, त्यांच्यावर अन्याय होणार नाही : अमित शहा
राणे महाराष्ट्राचे दबंग नेते, झोप विसरून मेहनत करतात; फडणवीसांची स्तुतीसुमनं
व्हिडीओ पाहा :
Amit Shah say CM Uddhav Thackeray lying about CM promise in Maharashtra