नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या बंडामुळे सध्या शिवसेना घायाळ झालेत. शिवसेनेत दोन मोठे गट पडलेत आणि या दोन गटातला संघर्ष सध्या टोकाला पोहोचलाय. तर शिवसेना (Shivsena) नेमकी कुणाची? हे सुप्रीम कोर्टातच ठरणार आहे. दुसरीकडे मनसे मात्र संधीच्या शोधात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) हे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. गेल्या दोन महिन्यात अमित ठाकरेंनी महाराष्ट्रात अनेक दौरे केले आहेत. त्यांनी ऐन पावसाळ्यात कोकणाचा दौरा केलाय. तसेच मराठवाड्यात ही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील भाजप नेतेही अमित ठाकरेंच्या दौऱ्यादरम्याने भेटीगाठी घेताना दिसून आले. आज ते नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी एक मोठं विधान केलंय. त्यांचं हे विधान आता जास्त चर्चेत आलंय.
सध्याचं राजकारण बघता तरुणांनी राजकारणात यावं का ? असा प्रश्न विचारला असता त्यांनी मी जर बाहेर असतो तर मी देखील इकडे वळालो नसतो, असे असे थेट उत्तर दिलंय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून मालेगावात त्यांनी विद्यार्थी व युवा वर्गाशी ते संवाद साधत आहेत. मालेगावात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मालेगावात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या दौऱ्या दरम्यान पत्रकारांशी संवाद साधतांना अमित ठाकरे यांनी सांगितले की, हा दौरा केवळ मनविसेची पुनर्बांधणी करण्यासाठी असून विद्यार्थी व युवा वर्गाशी संवाद साधण्यासाठी आहे. राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनात काम करण्यासाठी अनेक युवा उत्सुक असल्याचे या दौऱ्या दरम्यान दिसत आहे.
ठाकरे घराण्यावर संकट असल्याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी यावर बोलण्याचे टाळत राज ठाकरे यांचेकडे विषय वळवल्याचे दिसून आले. राज ठाकरेंनी यावर आपल मत व्यक्त केलं आहे आणि त्या मताशी आम्ही सहमत आहोत. मनविसे वाढवण्याच्या दृष्टीने ‘ पॉजीटिव्ह ‘ उद्देश घेवून दौरा सुरू असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. नाशिकच्या मालेगाव, येवला, मनमाड, नांदगाव, दौऱ्यात अमित ठाकरे हे युवा वर्गाशी संवाद साधत आहे. अमित ठाकरेंच्या दौऱ्यांमुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसेची ताकद वाढण्याची शक्यता आहे. तसेच अलिकडे वाढत असलेली मनसे भाजपची जवळीकही आगामी काळातील समीकरणं बदलू शकते.