मुंबई : मुंबई मेट्रोचं आरेतील कारशेड हे नवं सरकार आल्यापासून पुन्हा चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच दिवशी मेट्रोचं कारशेड हे आरेत नेण्याची तयारी केली. त्याला लगेच शिवसेनेकडून विरोधही झाला. मात्र मनसेनेही या वादात उडी घेतली आहे. मनसे नेते आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी यावरूनच एक सणसणीत पोस्ट लिहीत मेट्रोचं कारशेड हे आरेत करण्यास विरोध केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कारशेडरून वाद सुरू आहे. फडणवीस सरकारच्या काळात मेट्रो कारशेडचं आरेत कामही सुरू झालं. मात्र त्याचवेळी त्याच्यासोबत सत्तेत असणाऱ्या शिवसेने या कारशेडला कडाडून विरोध केला. तसेच महाविकास आघाडीचं सरकार येताच आरेतील कारशेडचं काम थांबवलं आणि कारशेडच्या जागेसाठी कांजुरमार्गची जागा निवडली. मात्र आता पुन्हा भाजप आणि शिंदे गटाचे सरकार येताच पुन्हा कारशेड आरेतच करण्याच्या हलचाली वेगवान झाल्या आहेत. त्यालाच आता अमित ठाकरेंनी विरोध केला आहे.
मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुण तरुणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकलं होतं…
आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. आपलं पर्यावरण उद्ध्वस्त झालं तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही, याचं भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवं. नवे मुख्यमंत्री आणि नवे उपमुख्यमंत्री यांनी आरेतील मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार “करावा, ही आग्रहाची विनंती.
फडणवीसांच्या काळात आरेतील जागेला झालेला शिवसेनेचा आणि पर्यावरणप्रेमींचा वाद पाहाता ठाकरे सरकारने कारशेडसाठी काजुरमार्गमधील जागात निवडली मात्र या जागेवरूनही वाद झाला. ही जागा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वादात राहिली. कारण या जागेवर दोन्ही कडून दावे करण्यात आले. ही जागा केंद्राची आहे त्यामुळे राज्य सरकारला या जागेवर कारशेड उभारण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली. त्यामुळे राज्य सरकारपुढे नवा पेच तयार झाला. तसेच आत्ता सत्तेत आलेल्या नव्या सरकारने आरेतील काम हे 25 टक्के पूर्ण झालं आहे, असा दावाही केला. मात्र मागील काही दिवसात मनसे आणि भाजप एकमेकांचं भरभरून कौतुक करत असताना आता या विरोधाने फडणवीसांसमोरील पेच वाढला आहे.