कल्याण – कल्याण कर्जत (Kalyan Karjat) राज्य महामार्गावर अंबरनाथ आणि बदलापूर शहरांदरम्यान (Ambernath Badlapur City) असलेल्या चिखलोली परिसरात खड्डे पडले होते. अनेक दिवसांपासून हा महामार्ग खड्ड्यात गेल्यानं नागरिकांना त्रास होत होता. मात्र अखेर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं हे खड्डे बुजवण्यात आले असून नागरिकांनाही त्यामुळं दिलासा मिळालाय. महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाल्यानंतर अंबरनाथ आणि बदलापूर शहरात मोठे खड्डे पडले होते. परंतु तक्रारी देऊनही तिकडं कानाडोळा झाला होता. परंतु अमित ठाकरे (Amit Thackeray) दौऱ्यावर असल्याने तिथल्या रस्त्यांमधील खड्डे भरण्यात आले आहेत. त्यामुळे तिथल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कल्याण कर्जत राज्य महामार्गावर अंबरनाथ आणि बदलापूर शहरांदरम्यान मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत होती. या खड्ड्यांकडे सर्वच शासकीय यंत्रणांचं दुर्लक्ष होत असल्यानं रस्त्याला कुणीही वाली उरला नव्हता. मात्र राजपुत्राच्या आगमनानं अखेर नागरिकांना दिलासा मिळाला. कारण राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे शुक्रवारी अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगर शहरांच्या दौऱ्यावर आले होते. मुंबईपासून अंबरनाथपर्यंतचा प्रवास त्यांनी लोकलने केला. मात्र पुढे बदलापूरला ते याच खड्डेमय रस्त्यावरून जाणार असल्यानं हे खड्डे तातडीनं बुजवण्यात आले. आता हे खड्डे रस्त्याच्या डागडुजीची जबाबदारी असलेल्या एमआयडीसीने भरले? एमएमआरडीएने भरले? बदलापूर पालिकेने भरले? की मनसेच्या कार्यकर्त्यांनीच भरले? हे मात्र समजू शकलेलं नाही. मात्र अमित ठाकरे यांच्या आगमनाने सर्वसामान्य वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला.
अमित ठाकरेंच्या दौऱ्याचा फायदा तिथल्या नागरिकांना झाला आहे. कारण पावळ्यात पडलेले खड्डे भरले जात नव्हते. त्याचबरोबर अनेक ठिकाणी किरकोळ अपघाताच्या घटना देखील घडल्या होत्या. आत्ता रस्ता व्यवस्थित झाल्याने तिथल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.