नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या (Amol Kolhe on Aditya Thackeray) मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाला लक्ष्य केलं आहे. शिवसेना विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2019) 288 पैकी केवळ 124 जागा लढवून मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं बघत आहे. हे अवास्तव असल्याचं मत अमोल कोल्हे (Amol Kolhe in Nashik) यांनी व्यक्त केलं. कोल्हे यांनी यातून युतीच्या जागावाटपात शिवसेनेला मिळालेल्या कमी जागा आणि बहुमतासाठी आवश्यक 145 जागांचा आकडा याची तुलना केली आहे. तसेच शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अमोल कोल्हे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत जनता हे सरकार उलथून टाकणार असल्याचाही दावा केला. कोल्हे म्हणाले, “माझ्या सभांमध्ये जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आघाडीचे उमेदवार नक्की विजयी होतील अशी अपेक्षा आहे. भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. या सरकारच्या पारदर्शीपणाचा बुरखा टराटरा फाटला आहे. त्यामुळे आता जनता हे सरकार उलथून टाकेल आणि परिवर्तन होईल.”
जो माणूस बोलतो त्याचे मागे चौकशीचा ससेमिरा
अमोल कोल्हेंनी सरकारच्या कामावरही घणाघाती टीका केली. भाजपवर न केलेल्या कामांचा आणि निष्क्रियतेचा दबाव असल्याचं ते म्हणाले. सरकार जो माणूस बोलतो, त्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावत आहे, असा आरोपही कोल्हेंनी केला.
छगन भुजबळ यांच्या मांजरपाडा प्रकल्पाचे श्रेय घेणाऱ्यांची किव वाटते, असंही अमोल कोल्हेंनी सांगितलं. तसेच विधानसभा निवडणुकीत आघाडीचं सरकार येईल इतक्या जागा नक्कीच मिळतील, असंही ते म्हणाले.