मुंबई : मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आणि आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आता शिवस्वराज्य यात्रा (NCP Shiv Swarajya Yatra) काढणार आहे. महत्त्वाचं म्हणजे शिवस्वराज्य यात्रेची धुरा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. याशिवाय खासदार उदयनराजे भोसले हे देखील या शिवस्वराज्य यात्रेत ठिकठिकाणी स्टार कॅम्पेनर म्हणून सहभागी होणार आहेत. शिवस्वराज्य यात्रेला 6 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.
राष्ट्रवादीच्या या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीपासून म्हणजेच जुन्नर येथून होणार आहे. रोज 3 विधानसभा मतदारसंघ कव्हर करणार आहेत. पहिला टप्पा हा जिजाऊंच्या जन्मस्थानी म्हणजेच बुलडाण्यातील सिंदखेडराजा येथे संपेल.
16 ऑगस्ट रोजी या शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा तुळजापूर येथून सुरू होईल आणि या यात्रेची सांगता रायगडावर होणार आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण यात्रेची मदार युवक राष्ट्रवादी काँग्रेसवर सोपवण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात महाजनादेश यात्रेचं आयोजन केलं आहे. या यात्रेची ग्रॅण्ड तयारी भाजपने केली आहे. या यात्रेच्या उद्घाटनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तर समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे. भाजपची महाजनादेश यात्रा 1 ऑगस्टपासून अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून सुरु होत आहे.
संबंधित बातम्या
उद्घाटनाला अमित शाह, समारोपाला मोदी, फडणवीसांची महाजनादेश यात्रा