मुबंई : शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्याच अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. हे अधिवेशन गाजले ते विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे 50 खोके एकदम OK या घोषणेवरुन तर मोठा गदारोळ माजला. सत्ताधारी आणि विरोधक तर थेट आमने सामने आले. 50 खोके एकदम OK या घोषणाबाजीने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी शिंदे गटाच्या आमदारांसह भाजपच्या आमदारांनाही हैराण करुन टाकले. सूर्य चंद्र असेपर्यंत 50 खोके एकदम OK हा डायलॉग म्हटला जाईल असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांनी घोषणाबाजीवर ठाम असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
50 खोके एकदम OK सह ’50 खोके खाऊ खाऊ माजले बोके, ईडीचं सरकार हाय हाय, फिफ्टी फिफ्टी चला गुवाहाटी’, अशी घोषणाबाजी विरोधकांनी केल्या. यानंतर सत्ताधाऱ्यांनी देखील वाझेचे खोके, मातोश्री ओक्के…. लवासाचे खोके, बारामती OK अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. या घोषणाबाजीवरुन अधिवेशनादरम्यान विधानभवनाबाहेर सत्ताधारी आणि विरोधकांचा राडा पहायला मिळाला. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात जोरदार घमासान पहायला मिळाले.
अखेर आज अधिवेशनाचे सुप वाजलेय. या अधिवेशनात कोणाचेच प्रश्न सुटलेले नाहीत. जनतेने खूप अपेक्षेने या अधिवेशनकडे पाहिलं होतं. पण या सरकारमधील मंत्र्यांना प्रश्नांची उत्तरे देता आलेली नाहीत. ओला दुष्काळ जाहीर होईल अशी अपेक्षा होती मात्र, यापैकी एकाही बाबतीत निर्णय झालेला नाही. हे अधिवेशन वांझोटं निघालं अशी टीका अमोल मिटकरी यांनी केलीय.
या अधिवेशनात खोक्याचा विषय गाजला. यावर देखील अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिलेय. हे खोके भरलेले होते की रिकामे हे ज्याच त्याला माहिती. सुरुवातीचे तीन दिवस 50 खोके एकदम ओके हे लावून धरल्याने सत्ताधारी नेत्यांना हे रुचलं नाही म्हणून त्यांनी काल दादागिरीची भाषा केली असा आरोप मिटकरी यांनी केला. सभागृहात सरकारच्या मंत्र्यांच्या चेहऱ्यावरील एकंदरीत भाव तपासले तर स्पष्ट दिसून येते की शिंदे फडणवीस सरकारमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे 50 खोके एकदम ओके ही तळागाळातील लोकांची भावना सत्ताधाऱ्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे . त्यात पाच न्यायमुर्तीच्या खंडपीठामुळे धाकधुक वाढली आहे.
चंद्र, सूर्य असेपर्यंत 50 खोके एकदम ओके हा वाक्प्रचार म्हटला जाईल. या आमदारांचे नातू देखील म्हणतील आजोबा 50 खोके एकदम ओके असा टोला अमोल मिटकरी यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
आदित्य ठाकरेंना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे मातोश्री आणि ठाकरेंवर टीका केली जातेय. या आमदारांनी फक्त बाळासाहेबांचा फोटो बाजूला ठेवून निवडून येऊन दाखवावं असं आवाहन देखील अमोल मिटकरी यांनी केले आहे.