मुंबई : सोलापुरातील शेतकरी मेळाव्यात बोलताना आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शेतकऱ्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) मिमिक्री केली. 2024 च्या निवडणुकीवरही भाष्य केलं.
मिटकरींनी मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करत एकनाथ शिंदेंवर टीका केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कालचं भाषण ऐकलं का? त्या भाषणात ते म्हणतात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब… मुख्यमंत्र्यांनाच वाटत नसेल की मी मुख्यमंत्री आहे मग कसं करावं?, असं मिटकरी म्हणालेत.
अमोल मिटकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केलीय. “मेरे प्यारे भाई और बहनों… हा अमीन सयानी यांचा शब्द पंतप्रधानांनी चोरला. मोदी हा चोरच आहे. गुजरातमध्ये सत्ता आली म्हणजे संपूर्ण देश भाजपचा झाला असे होत नाही. शरम तो उनको आती है जो शरम को शर्माते है, ये तो इतने बेशरम है की शरम भी इनको शर्माती है! गुजरात जिंकला म्हणजे देश जिंकला असे नाही, महाराष्ट्राच्या निवडणुका अजून बाकी आहेत, त्या कधीही लागू शकतात, असं मिटकरी म्हणालेत.
महाराष्ट्रात साडेतीन पीठ शक्तीपीठ असताना महराष्ट्राबाहेर म्हणजे आसामला का गेले? इथल्या देवीचे सत्व हरपले का? तिकडच्या देवाचे महत्त्व वाढवले महाराष्ट्रातले देव संपले का? कुठे आहे रे तुमचे हिंदुत्व? हा माझा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे, असंही मिटकरी म्हणालेत.