“प्रसाद लाड नाक घासून महाराष्ट्राची माफी मागा!, प्रायश्चित्त करा “, अमोल मिटकरी संतापले

| Updated on: Dec 04, 2022 | 11:46 AM

प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरी यांची संतप्त प्रतिक्रिया...

प्रसाद लाड नाक घासून महाराष्ट्राची माफी मागा!, प्रायश्चित्त करा , अमोल मिटकरी संतापले
Follow us on

मुंबई : भाजप नेते प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. “शिवरायांचा जन्म कोकणात झाला”, असं भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.”प्रसाद लाड नाक घासून महाराष्ट्राची माफी मागा!, प्रायश्चित्त करा “, असं अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले आहेत.

रोज सकाळ झाली की भाजपच्या नेत्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत नवं बेताल वक्तव्य समोर येतं. शिवरायांच्या अपमान करणाऱ्या वक्तव्यांची भाजपने मालिकाच सुरु केली आहे. प्रसाद लाड यांनी तर नवीनच जावई शोध लावलाय. प्रसाद लाड महाराष्ट्राची माफी मागा! फक्त माफी मागूनही चालणार नाही तर नाक घासून प्रायश्चित्त करा, असं मिटकरी म्हणालेत.

“भाजपचे आमदार श्री. प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवात नवीन इतिहास मांडला. “छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला व त्यांचे बालपण रायगडावर गेले” .परत एकदा इतिहासाशी छेडछाड झाली आहे. भाजपनी छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची व अपमानाची सुपारी घेतली आहे का?”, असा सवाल अमोल मिटकरींनी विचारला आहे.

प्रसाद लाडांच्या अभ्यासात भर पडावी याकरिता चौथीच्या इतिहासाचे हे पुस्तक त्यांना माझ्याकडून पाठवीत आहे, असं ट्विट मिटकरींनी केलं आहे.

प्रसाद लाड यांचं वक्तव्य

“हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. रायगडावर शिवरायांचं बालपण गेलं आणि याच रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली”, असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलंय. ते मुंबईतील कोकण महोत्सवात बोलत होते.