बच्चू कडूंना ‘ते’ वक्तव्य भोवणार? अमरावतीत महिला मुक्ती मोर्चा आक्रमक, गुन्हा दाखल

| Updated on: Oct 28, 2022 | 4:31 PM

रवी राणांनी अशा प्रकारे इतरांमार्फत तक्रार दाखल करून घाणेरडं राजकारण करू नये, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय.

बच्चू कडूंना ते वक्तव्य भोवणार? अमरावतीत महिला मुक्ती मोर्चा आक्रमक, गुन्हा दाखल
Image Credit source: social media
Follow us on

स्वप्निल उमपः रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर आरोप करताना प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. रवी राणा यांच्याविरोधात टीका करताना बच्चू कडू यांनी महिलांबाबत तसेच तृतीय पंथियांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले आहे, असा आरोप महिला मुक्ती मोर्चा (Mahila Mukti Morcha) कडून करण्यात आला आहे. महिला मुक्ती मोर्चाने बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी आमदार बच्चू कडू यांच्या विरुद्ध 501 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

अमरावतीत रवी राणा यांच्याविरोधात तक्रार दाखल करताना बच्चू कडू यांनी ते वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. एका बापाची औलाद असाल तर आम्ही पैसे घेतल्याचे पुरावे द्या, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं होतं. पुरावे दिले तर त्यांच्या घरची भांडी घासू असंही बच्चू कडू म्हणाले होते. या वक्तव्याविरोधात महिला मुक्ती मोर्चा आक्रमक झाली आहे.

दरम्यान, बच्चू कडू यांनी या तक्रारीवरूनही प्रतिक्रिया दिली आहे. रवी राणांनी अशा प्रकारे इतरांमार्फत तक्रार दाखल करून घाणेरडं राजकारण करू नये, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय.

मी आमदार रवी राणांच्या आईवर बोललो नाही..राणांनी हे घाणेरडं राजकारण करू नये.. राणा यांच्या आरोपा विरोधात 50 कोटी रुपयांचा दावा मी ठोकणार आहे. स्वतः लपण्यासाठी आईला समोर समोर करत आहे, असा टोमणा बच्चू कडू यांनी मारला आहे.