अमरावतीः प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) नाव न घेता त्यांना टोमणा मारला. खास विदर्भाच्या भाषेत त्यांनी सुनावलं. माणसानं एकतर राजा व्हाचं नाही आणि झालं तर आळस कराचा नाही.. नाही तर अशा राजाचं राज्य टिकत नाही, हे आपण दाखवून दिलं, अशा शब्दात बच्चू कडू यांनी टोला लगावला.
प्रामाणिकता महत्त्वाची आहे. मी राजा झालो म्हणून झोपायचं, ठरलेल्या वेळातच भेटायचं, असं चालणार नाही, असं बच्चू कडू म्हणाले. अमरावती येथील एका कार्यक्रमात भाषणादरम्यान आमदार बच्चू कडू बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी महिला मुख्यमंत्री पदाचे सूतोवाच केल्यानंतर हा विषय चांगलाच चर्चेत आहे. अमरावतीत बोलताना बच्चू कडू यांनीही यावर तिखट प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरे यांना महिला मुख्यमंत्री करायचा होता तर तेव्हाच करायला पाहिजे होता. तुमच्यापेक्षा बरं राहिलं असतं, असं बच्चू कडू म्हणाले. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची घोषणा झाल्यानंतर प्रथमच आमदार बच्चू कडू अमरावतीत आले.
दिव्यांग बांधव व प्रहार कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं. यावेळी बच्चू कडू यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
तर एका पत्रावर त्यांनी दिव्यांग मंत्रालय उभारलं… तर आता पूर्ण भारतभर दिव्यांग मंत्रालयाचा पायंडा पडणार असा विश्वास व्यक्त केला.
महाराष्ट्र शासनाने दिव्यांग मंत्रालय केलं आता पूर्ण भारतभर व्हावं, यासाठी आम्ही लढा उभारणार अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.