अमरावती : सध्या औरंगजेब, त्याची कबर, त्यावरून होणारी वक्तव्य राज्याच्या राजकारणात चर्चेत आहेत. अशातच नवनवी वक्तव्य समोर येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वक्तव्याला एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर दिलं आहे. तसंच भरसभेतून ओवैसी यांनी फडणवीसांना प्रश्न विचारला आहे. अमरावतीत एमआयएमची काल सभा झाली. तिथे ओवैसी बोलत होते.
औरंगजेबाची अवलाद कोणाला म्हणतात हे आम्हाला कळत नाही का?, असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
उपमुख्यमंत्री आहेत म्हणजे त्यांनी काहीही बोलू नये. जर त्यांनी हे मुस्लिमांना म्हटलं नाही तर मग कोणाला म्हटलं? याचं स्पष्टीकरण द्यावं, असंही ते म्हणाले.
फडणवीस यांनी हे विसरू नये की, इथे कोणीही मूळ भारतीय नाही. केवळ आदिवासी हेच मूळ भारतीय आहेत. कारण आम्हीही इतिहास चांगल्या प्रकारे जाणतो, असा टोला असदुद्दीन ओवैसी यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
देवेंद्र फडणवीसजी, एक गोष्ट लक्षात ठेवा जास्त ज्ञान आम्हाला देऊ नका, आम्हालाही थोडं ज्ञान आहे. आपण उपमुख्यमंत्री आहात याचा अर्थ असा नाही की जे तोंडात आलं ते बोलत राहाल, असा घणाघात ओवैसींनी केला आहे.
तुम्ही आधी बोलता अन् मग म्हणता की मी मुसलमानांबद्दल नाही बोललो. मग तुम्ही काय राक्षसांना बोलता काय? तुम्ही काय गोडसेच्या औलादीला बोललात काय?, असा सवाल ओवैसी यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
मी सातत्याने बोलतो आहे की, या औरंग्याच्या औलादी पैदा कुठून झाल्या? शेवटी महाराष्ट्रात आणि देशात औरंगजेबाचं रक्त कुणामध्येच नाहीये. तर मग औरंग्याच्या औलदी नेमक्या कोण आहेत? त्याच्या पाठीमागे कोण आहे? त्याचा इरादा काय आहे? ते महाराष्ट्रात काय घडवू इच्छितात?, हे लवकरच बाहेर येईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर आता असदुद्दीन ओवैसी यांनी भाष्य केलं आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनीही अमरावतीतील सभेला संबोधित केलं. मलकापूरच्या सभेमध्ये नारे लावल्याच्या बातम्या माध्यमाने दाखवल्या त्या घटनेचा निषेध करतो. किरीट सोमय्या यांनी चौकशी लावावी त्यांचंच सरकार सत्तेत आहे, असं जलील म्हणाले.