अमरावती : मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार स्थापन होऊन बरेच महिने झाले तरी राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. मात्र आता लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, अशी माहिती सुत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे. त्यावर बच्चू कडू बोलले आहेत.
जेवणाचं आमंत्रण जेवल्या शिवाय खरं नसतं, अशी मिश्किल प्रतिक्रिया मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडू यांनी दिली आहे.
घोडा मैदान जवळच आहे लढाई आहे. मंत्री नाही झालो तरी कामं करतोय. मंत्री झालो तर अधिक वेगाने काम करेन.पण मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे. विस्तार तातडीने होणं गरजेचं आहे. प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र पालकमंत्री भेटणं गरजेचं आहे ही जनतेची खरी मागणी आहे, असं बच्चू कडू म्हणालेत.
शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपतील सात आणि शिवसेनेतील सात जणांना संधी मिळणार आहे. शिवसेनेतील चार जणांची नावं सुत्रांकडून टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहेत. या महिना अखेरपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे. अनिल बाबर, भरत गोगावले, संजय रायमुलकर, बच्चू कडू या चौघांचं मंत्रिपद निश्चित असल्याचं सुत्रांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं आहे. त्यावर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संविधानाच्या कोणत्या कलमांना हात लावला हे स्पष्ट लिहायला पाहिजे मोघम लिहिण्यात काही अर्थ नसतो. सामनासारख्या पेपरने बोट दाखवून कोणत्या कलमात बदल केला कशाचं उल्लंघन झालं हे दाखवलं पाहिजे. एवढा मोठा पेपर एवढी मोठे त्यांचे नेते. पण त्यांनी मोघमपणे बोलणं काही चांगलं नाही, असं म्हणत बच्चू कडू यांनी सामनावर प्रतिक्रिया दिली आहे.
घराचा प्रश्न सर्वात आधी हा गोरगरीबांसाठी आहे. आमदार खासदारांच्या घराचा क्रम मागे लावला तरी चालेल. त्यांना घर देऊ नये असं माझं म्हणणं नाहीये. पण आधी गोरगरीब लोकांचे घर होऊ द्या मग आमदार खासदारांना घर द्या. एक कशाला चार-घर द्या. आमदार निवासामध्ये आमदाराला राहायला मिळत नाही. मतदारसंघातले आलेले पेशंट सर्वसामान्य लोक राहतात, असं म्हणत म्हाडाच्या लॉटरीवर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.