अमरावती 13 जुलै 2023 : मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यानं आमदार बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा होती. मात्र पत्रकार परिषद घेत आपण आपली भूमिका स्पष्ट करू असं त्यांनी आज सकाळी सांगितलं. त्या प्रमाणे पत्रकार परिषद घेत बच्चू कडू यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानलेत. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आपण गुलाम बनून राहू असंही बच्चू कडू म्हणाले.
मला महाविकास आघाडीत मंत्रिपद दिल्याने मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो, असं त्यांनी म्हटलं.
आम्हाला अनेकवेळा अनेकांनी आमिष दाखवलं. तरीही आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहिलो. पांचटपणा बच्चू कडूला जमत नाही. आम्हाला उद्धव ठाकरेंनी मंत्रीपद दिलं. त्यांच्यासाठी आम्ही योगदान दिलं. उध्दव ठाकरे यांना दिलेला पाठिंबा मागे घेण्यासाठी करोड रुपये ऑफर होती. दुसरा पक्ष द्यायला तयार होता. पण आम्ही नाकारलं. उद्धव ठाकरे यांनी दिव्यांग मंत्रालय दिलं असतं तर गुवाहाटीला जाण्याची वेळ आली नसती, असाही टोला कडू यांनी लगावला आहे.
एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं. त्यामुळे आम्ही आयुष्यभर त्याचे गुलाम बनून राहू, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.
मी मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी चर्चा करणार आहे. त्यानंतर मी माझा निर्णय घेणार आहे. मी 17 तारखेला मुख्यमंत्री यांना भेटून मग माझा निर्णय 18 तारखेला जाहीर करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी फार विनंती केली. म्हणून मी सध्या निर्णय मागे घेत आहे, असं बच्चू कडू यांनी जाहीर केलं.
या सरकारसोबत अश्या पद्धतीने मी जाणार नाही हे मी ठाम ठरवलं आहे. पद घेण्यापेक्षा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करायची इच्छा आहे. मुख्यमंत्री पेचात असताना त्यांना मदत करण्याचा माझा निर्णय आहे. आम्हाला अजित दादा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याशी काहीच घेणं देणं नाही, असं बच्चू कडू म्हणाले.
मोदींच्या लाटेत कार्यकर्ते म्हणत होते. भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवा. पण मी नकार दिला, असा खुलासाही बच्चू कडू यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केला आहे.
काल मी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आणि सैनिकांसाठी मंत्रिपद मागितलं. इतनी शक्ती हमे देना दाता हे गाणं रात्रभर ऐकलं आणि मनात आलं की मंत्रिपद नाही पाहिजे. मंत्रिपद काही माणसांपेक्षा मोठं आहे का? पंधरा वर्षात साडे तीनशे गुन्हे दाखल झाले आहेत. माझं पुढचं आयुष्य कदाचित जेलमध्ये जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.