अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी (1 जानेवारी) अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील पुरवठा निरीक्षक प्रमोद काळे आणि सपना भोवते यांच्यावर कारवाईचे आदेश दिले. या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यासाठी ते प्रस्ताव मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. बच्चू कडू (State Minister Bacchu Kadu) यांच्या या निर्णयानंतर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलेली कारवाई ही एकतर्फी असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे.
बच्चू कडू यांनी केलेली ही कारवाई चुकीच्या पद्धतीची आहे, अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्यासाठी वेळ देण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे म्हणणेही ऐकून घेतले नाही. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एकतर्फी कारवाई केली असल्याचं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं आहे. तसेच, अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले.
नेमकं प्रकरणं काय?
राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याननंतर बच्चू कडू हे थेट कामाला लागले. बच्चू कडू यांनी पहिल्याच दिवशी दणका देत दोन पुरवठा निरीक्षक प्रमोद काळे आणि सपना भोवते यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचे आदेश दिले. पारधी समाजाच्या एका सामान्य शेतकऱ्याची फाईल कोणतीही कारवाई न करता प्रलंबित ठेवल्याने या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा : कलेक्टर असो की सचिव कारवाई तर होणारच, बच्चू कडूंची ‘सीधी बात, नो बकवास’
बच्चू कडू यांना शिवसेनेने आपल्या कोट्यातून राज्यमंत्रीपद दिलं. मात्र, अद्याप खातेवाटप झालेलं नाही. त्यामुळे बच्चू कडू यांना तहसीलदारांना निलंबित करण्याचे आदेश देता येतात का असा प्रश्न आहे. खातेवाटप होईपर्यंत बच्चू कडू हे निलंबनाची शिफारस करु शकतात. दरम्यान, सेवा हमी कायद्याचं पालन झालं नाही, तर बच्चू कडूचा सामना करावा लागेल, असा इशारा बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
Work-off agitation against Bachchu Kadu