मुंबई: भारतीय जनता पक्ष केवळ देशातील सर्वात मोठा पक्ष नाही तर अन्य बाबींमध्येही भाजप नंबर वन आहे. भाजप हा देशातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष आहे. गेल्या वर्षी भाजपला देणगी स्वरुपात जवळपास एक हजार कोटींपेक्षा जास्त रुपये मिळाले. त्यापैकी 700 कोटी पेक्षा जास्त रक्कम भाजपने खर्च केली आहे. ‘आज तक’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) रिपोर्टनुसार, आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये भाजपने एकूण संपत्ती 1027.34 कोटी रुपये घोषित केली होती. ज्यापैकी 758.47 कोटी रुपये (74 टक्के) खर्च करण्यात आले. दुसरीकडे काँग्रेसने अद्याप आपला ऑडिट रिपोर्ट सादर केलेला नाही.
या रिपोर्टमधील महत्त्वाची बाब म्हणजे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खर्चात कमाल केली आहे. कारण उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केल्याची नोंद राष्ट्रवादीने केली आहे. राष्ट्रवादीने 2017-18 मध्ये आपल्या तिजोरीत 8 कोटी 15 लाख रुपये असल्याचं दाखवलं. मात्र 8 कोटी 84 लाख रुपये खर्च केल्याचं राष्ट्रवादीने या अहवालात नमूद केलं आहे. त्यामुळे उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करण्याचा पराक्रम राष्ट्रवादीने केला आहे.
रिपोर्टनुसार 2017-18 मध्ये मायावतींच्या बसपाची संपत्ती 51.7 कोटी रुपये होती. यापैकी केवळ 29 टक्के म्हणजे 14.78 कोटी रुपये खर्च केले.