पुणेः महाराष्ट्राकडून काही दिल्याशिवाय कर्नाटक (Karnataka) राज्य आपल्याला बेळगाव, निपाणी, कारवार आदी गावं देणार नाही, असं वक्तव्य काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. या वक्तव्यावरून हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे (Anand Dave) यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्रातली काही गावं कर्नाटकला देणं हे तुमच्या जागावाटपाएवढं सोपं आहे का, असा सवाल आनंद दवे यांनी केलाय.
बेळगाव, निपाणी, कारवार आदी मराठी भाषिक गावांना महाराष्ट्रात विलीन करण्याचा अनेक वर्षांपासून वाद सुरु आहे. सुप्रीम कोर्टातही हा वाद प्रलंबित आहे. मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नुकतेच यासंबंधी धक्कादायक वक्तव्य केले.
सांगलीतील जत तालुका, तसेच सोलापूरातील अक्कलकोटही कर्नाटकात घेण्यासंबंधी विचार सुरु असल्याचं ते म्हणाले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही इशारा दिला. महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही, असे ते म्हणाले. कोर्टात आपली बाजू भक्कम असल्याचा विश्वासही त्यांनी दर्शवला.
पण सीमा प्रश्न सोडवण्याचा भाजपतर्फे फक्त दिखावा सुरु आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिलं. आपण काहीतरी दिल्याशिवाय कर्नाटक आपल्याला बेळगाव, कारवार, निपाणी देणार नाही… नुसतंच द्या… असं म्हणल्यावर ते कसे देणार, असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला.
पवार यांच्या या वक्तव्यावरून आनंद दवे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सीमा प्रश्नावर एवढा सोपा तोडगा आतापर्यंत का सापडला नाही, असा टोमणा त्यांनी लगावला. पवार यांचं अतिशय धक्कादायक आणि शोक व्यक्त करण्यासारखं हे वक्तव्य आहे.
महाराष्ट्राची गावं ही तुमच्या राजकीय पक्षांच्या जागावाटपासारखी नाहीत. तुम्ही २ जागा सोडा, आम्ही २ सोडू.. असं हे नाही… त्यामुळे शरद पवार यांनी हे वक्तव्य करत असताना विचार करायला आवश्यक होतं. पण महाराष्ट्रानं हे विधान गांभीर्याने घेतलं नाही, हे बरं झालं, अशी प्रतिक्रिया आनंद दवे यांनी व्यक्त केली.