मुंबई : (CM Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन दीड महिना लोटला आहे. असे असताना आजही मुख्यमंत्रीपदी विराजमान का व्हावे लागले हे सांगताना भिन्नता समोर येत आहे. यापू्र्वी हिंदूत्व आणि (Balasaheb Thackeray) बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी ही क्रांती केल्याचे त्यांनी अनेकवेळा सांगितले आहे. मात्र, (Aanand Dighe) आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त शुक्रवारी आनंद मठात दाखल झाले तेव्हा मात्र, हिंदूत्वाचा उल्लेख न करता केवळ आनंद दिघे यांची इच्छा होती की, या राज्याच्या सर्वोच्च पदावर ठाणेकर असावा, शिवाय ही त्यांची इच्छा त्यांच्या बहीण अरुणाताई यांनी बोलूनही दाखवल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे बंडानंतर सत्तांतर झाले मात्र, नेमका कोणत उद्देश ठेऊन हा प्रश्न आजही कायम आहे.
शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट निर्माण केला. मात्र, बंडाच्या दरम्यान केवळ हिंदूत्व आणि महाविकास आघाडीमध्ये नको या दोनच मुद्द्यांवर त्यांनी भर दिला होता. त्यानंतर शिवसेनेकडून होत असलेली टीका टिपण्णी पाहता त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जोपासण्यासाठी ही भूमिका घेतल्याचे सांगितले. तर आज आनंद दिघे यांचीच इच्छा होती की, राज्याच्या सर्वोच्च पदावर ठाणेकर असावा म्हणून. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या मनात काय आहे हे समजू शकलेले नाही.
जनतेच्या आशीर्वादाने सध्या सर्वोच्च पदावर असलो तरी या पदापेक्षा जनतेसाठी काय करता येते हे महत्वाचे आहे. गेल्या दीड महिन्यापासून अविरत जनतेची सेवा सुरु आहे. शिवाय झालेला बदलही जनतेने स्विकारलेला आहे. त्यामुळे आता मागच्या राजकारणात न पडता केवळ सर्वसामान्यांचा विकास हेच आपले ध्येय असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. आतापर्यंत ऐतिहासिक निर्णय घेऊन दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. विरोधकांकडून काहीही अफवा पसरवल्या जात असल्या तरी जनतेशी बांधील असल्याने त्याकडे दुर्लक्ष असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
आंगद दिघे यांची आज पुण्यतिथी असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मठात दाखल झाले होते. त्यांनी दिघेंच्या प्रतिमेचे दर्शन घेतले आणि आनंद दिघे यांच्या विचाराचाच आपल्यावर प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय त्यांचे आशिर्वाद आणि शुभेच्छा याशिवाय हे शक्य नव्हते असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यांच्या सानिध्यामध्ये अनेक वर्ष काम केले. त्यांचा आदर्श, शिकवण आणि कार्यपद्धती याचा आपल्यावर प्रभाव असल्यानेच हे शक्य झाल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांनी केलेले विधान अनेकांसाठी वेगळे असू शकते.