औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीला औरंगाबाद शहरात पहिला मोठा धक्का बसला आहे. प्रकाश आंबेडकर यांचे सख्खे भाऊ आणि रिपब्लिकन सेना या राजकीय संघटनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar left vanchit aaghadi) यांनी आपण वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर राज्यात एक नवीन पर्याय देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यात नवीन समीकरणे उदयाला येण्याची शक्यता आहे. (Anandraj Ambedkar left vanchit aaghadi)
आनंदराज आंबेडकर हे प्रकाश आंबेडकर यांचे सख्खे भाऊ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू. पण याच आनंदराज आंबेडकर यांनी आपला मोठा भाऊ प्रकाश आंबेडकर यांनी उभा केलेल्या वंचित बहुजन आघाडी हा पर्याय समस्त आंबेडकरी जनतेला निराश करणारा आहे असं वक्तव्य केलं. त्याचबरोबर आपण वंचितमधून बाहेर पडत असल्याचं सांगितलं आहे.
आनंदराज आंबेडकर यांनी वंचितमधून बाहेर पडण्याचा फक्त निर्णय घेतला नाही तर वंचित बहुजन आघाडीवर काही आरोप सुद्धा केले आहेत. “वंचित बहुजन आघाडीत ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारे किती खरे नेते होते असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित यश मिळालं नाही”, असाही दावा त्यांनी केला. आनंदराज आंबेडकर यांच्या आशा पध्दतीने आरोप करून वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्यामुळे वंचित बहुजन आघाडीवर दूरगामी परिणाम होणार आहेत.
वंचित बहुजन आघाडीतून सर्वात प्रथम बाहेर पडले भटक्या विमुक्तांचे नेते लक्ष्मण माने. त्यानंतर इम्तियाज जलील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात बेबनाव निर्माण झाल्यामुळे एमआयएम सुद्धा वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडली. एमआयएम बाहेर पडल्यामुळे वंचित बहुजन आघाडीला खरा झटका बसला आणि निवडणूक प्रक्रियेतून निवडून येण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या अनेकांच्या स्वप्नांवर पाणी पडले.
सध्या प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग राज्यात अजूनही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचे खंदे शिलेदार या प्रयोगातून बाहेर पडत आहेत. आणि आता त्यांचे सख्खे बंधू वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचं नव्याने मूल्यमापन सुरू झालं आहे.