गिरीश गायकवाड, मुंबईः पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता अंधेरी पोट निवडणुकीतील उमेदवारही गमावणार का अशी चिन्ह निर्माण झाली आहेत. असं घडलं तर उद्धव ठाकरेंसाठी मोठं संकट उभं राहणार आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची (Andheri East By poll) पोटनिवडणूक ही आगामी मुंबई पालिकेची ट्रेलरच आहे. त्यामुळे शिंदे गट, भाजपा आणि उद्धव ठाकरे गट या तिघांसाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे. शिवसेनेने (Shivsena)जाहीर केलेल्या उमेदवारालाच खेचण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ठाकरे गटाने या निवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र लटके यांनाच आपल्याकडे खेचण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात ऋतुजा लटके यांना आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती समोर आली आहे. आपला पक्ष आणि भाजप युतीची उमेदवारी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील असल्याची उच्चपदस्थ सूत्रांची माहीती आहे.
शिवसेना आमदार रमेश लटके यांचं मे 2022 मध्ये निधन झालं होतं. त्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. येत्या नोव्हेंबर महिन्यात इथे पोटनिवडणूक होत आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने ही सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची लढत ठरणार आहे.
त्याामुळेच शिवसेनेला मिळत असलेल्या सहानुभूतीला काटशाह देण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. भाजप नेते मुरजी पटेल यांनी ही निवडणूक लढविण्यासाठी काम सुरू केले आहे. तरीही अद्यापअधिकृत घोषणा नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आत्ता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे.