Image Credit source: social media
मुंबईः सहानुभूती (Sympathy) हा एकच निष्कर्ष अंधेरी पोटनिवडणुकीत लागू होईल का? असा प्रश्न मनात येत असेल तर याचं उत्तर नाही. कारण सध्या सत्तेचा वापर, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव, सहानुभूती, भावनिक आव्हान, द्वेष, विद्रोह आदी मुद्दे झळकत असले तरी प्रत्यक्षात जनता कुठे कुठे विभागली गेलीये, हे पाहवं लागेल. म्हणूनच महाराष्ट्राचं (Maharashtra Politics) लक्ष लागलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा (Andheri East By poll) मतदार संघाचं गणित आणि इतिहास समजून घेणं आवश्यक आहे.
- अंधेरी पूर्वमध्ये जवळपास 2 लाख 80 हजारांच्या आसपास मतदार आहेत. पण हा कॉस्मो अर्थात मिक्स लोकसंख्या असलेला मतदारसंघ आहे. इथं मराठी, नवबौद्ध, मुस्लिम, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय, तर गुजराती आणि ख्रिश्चन मतदार आहेत. म्हणूनच हा मुंबईतला मिनी भारत समजला जातो. कारण उच्चभ्रू-मध्यमवर्गीय अन् झोपडपटट्टीतल्या नागरिकही असल्याने त्यांचा प्रभाव महत्त्वाचा आहे. त्यामुळे फक्त मराठीच नव्हे तर शिवसेनेला इतरही मतदारांना सोबत घ्यावं लागणार आहे.
- 1970 पासून 2009 पर्यंत हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी हे इथलं प्रबळ नेतृत्व. 2014 च्या नरेंद्र मोदींच्या लाटेत मात्र इथली गणितं बदलली. 2014 ला भाजप-शिवसेनेची युती तुटली. शिवसेनेच्या लटकेंचा विजय झाला. पण मनसेमुळे मराठी मतं विभागली गेली. 2019 भाजप-शिवसेना पुन्हा युती झाली. मुरजी पटेलांचा पराभव करत पुन्हा रमेश लटकेंचा विजय झाला. पण यावेळी मुरजी पटेलांसाठी भाजप अनेक डावपेच खेळू शकते.
- सहानुभूती हा तर फॅक्टर आहेच. आधीच रमेश लटके यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्याकडे सहानुभूती जाणार. सत्ता हाती असताना फुटलेली शिवसेना आणि सध्या चहुबाजूंनी होणारी कोंडी याचीही सहानुभूती शिवसेनेला जाईल, अशी चिन्ह आहेत.
- उद्धव ठाकरे गट आणि त्यांच्याविरोधात उभ्या असलेल्या उमेदवारांचा विचार करता लटके कुटुंबीय सहाजिकच मराठी असल्याने अंधेरी परिसरात त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यातच रमेश लटकेंच्या अकाली निधनाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. तर याविरोधात असलेले मुरजी पटेल हेदेखील गुजराती असले तरीही त्यांचाही लोकसंपर्क उल्लेखनीय आहे. 2019 मधील निवडणुकीत त्यांनी भाजपाशी बंडखोरी करत 45 हजार मतं मिळवली. आता त्यांनाच हाताशी धरत भाजप-शिंदे गट लटकेंविरोधात सर्व शक्ती पणाला लावत आहेत.
- उरला प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा. तर यावेळी महाविकास आघाडीनं शिवसेनेला ही जागा बहाल केली आहे. 2019 मधील मतांचं गणित पाहिलं तर त्यावर ते का केलं हे कळेल. कारण त्यावेळी काँग्रेसला फारशी मतं नव्हती. यावरून काँग्रेसच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्याची स्थिती लक्षात येते. राष्ट्रवादी तर 2014 मध्येच 13 हजार मतदारांवर आखुडली होती.
2019 चं गणित काय होतं?
- शिवसेना- रमेश लटके- 62,680
- अपक्ष- मुरजी पटेल- 45, 808
- काँग्रेस- अमीन जगदीश कुट्टी- 27, 951