मुंबईः नारायण राणे असो की छगन भुजबळ… एकदा शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडलं की पराभवाचं शुक्लकाष्ठ मागे लागतं. हा इतिहास अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलाय. ठाकरे घराण्यातील राज ठाकरेही (Raj Thackeray) फार भरारी घेऊ शकले नाहीत. त्यामुळेच शिंदे गटाच्या नेत्यांना वारंवार निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान उद्धव ठाकरे गटाकडून देण्यात येतंय. तर आम्ही बाहेर पडल्याने शिवसेना गलितगात्र झाल्याचं शिंदे गटाकडून दर्शवण्यात येतंय. घोडा मैदान सामोर आहे. अंधेरी पूर्व विधानसभा (Andheri East By poll) मतदार संघाची निवडणूक आगामी महापालिका निवडणुकांची लिटमस टेस्ट मानली जातेय.
येथील शिवसेना आमदार रमेश लटके यांचं मे 2022 मध्ये निधन झालं. त्यामुळे पोटनिवडणूक लागली आहे. येत्या ३ नोव्हेंबर रोजी मतदान आहे. उद्या म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख.
शिवसेनेतर्फे रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित करण्यात आलं. ऋतुजा लटके या महापालिकेत क्लार्क पदावर कार्यरत असल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागतोय. मात्र पालिकेतील अधिकाऱ्यांकडून हा राजीनामा मंजूर करण्यात येत नाहीये.
हे प्रकरण कोर्टात गेलंय. शिंदे गट आणि भाजप राजीनामा रोखण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचं घाणेरडं राजकारण करतंय, असा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात येतोय. पण ऋतुजा लटके यांना उमेदवारी न मिळणं शिंदे गटासाठी फायद्याचं की तोट्याचं? असा विचार आणखी गुंता वाढवणारा ठरतोय…
1. म्हणजे बघा, ऋतुजा लटके यांना उद्धव ठाकरे गटातर्फे उमेदवारी मिळाली तर अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय होण्याची दाट शक्यता आहे. कारण एक तर उद्धव ठाकरेंच्या सद्यस्थितीबद्दल सहानुभूती. त्यातच रमेश लटके यांच्या विधवा पत्नी असल्याने ऋतुजा लटके यांच्याबद्दल सहानुभूतीचा फायदा ठाकरेंना होईल. त्यामुळे ऋतुजा लटकेंची उमेदवारी शिंदे गटासाठी तोट्याचीच समजली जातेय.
2. शिवसेना आरोप करतेय, त्यानुसार खऱंच ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीत शिंदे गटाकडून खोडा घालण्यात येत असेल तर हेसुद्धा सत्ताधाऱ्यांसाठी विशेषतः शिंदेंसाठी धोकादायक आहे. शिंदे गटाने आतापर्यंत बंडाची अनेक कारणं दिली. हिंदुत्व, खंजीर, उद्धव ठाकरेंची कार्यपद्धती आदी कारणं देऊन भाजपसोबत सत्तेत आले. पण आता सत्ता-महत्ता सर्वकाही असताना शिंदे गटाच्या खेळीकडे जनतेचं लक्ष आहे. सत्तेत असतानाही शिवसेनेच्या वाटेत खोडा घालणं, हे जनतेलाही रुचणारं नाही. ज्याचा परिणाम शिंदे गटाला आगामी निवडणुकीत भोगावा लागू शकतो.
भाजपतर्फे मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्याची आधी चर्चा होती. पण अद्याप याची घोषणा झालेली नाही. आता ऐनवेळी शिंदे गटातर्फे मुरजी पटेल उमेदवारी अर्ज भरतील, अशीही चर्चा सुरु आहे. कारण अंधेरी निवडणुकीसाठीच पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव निवडणूक आयोगामार्फत स्पष्ट करण्यात यावं, अशी घाई शिंदे गटाकडून करण्यात आली. ऋतुजा लटकेंना शिंदे गट आपल्याकडे खेचतोय, अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
एकूणच राजकारण करता करता अंधेरीतील उमेदवारी हा शिंदे गटासाठी डोकेदुखीच ठरल्याचं दिसून येतंय.