अंधेरी पूर्व पोटनिवडणूक; ऋतुजा लटके, मुरजी पटेल, मशाल, निवडणूक अर्ज, वाचा 10 Updates!

| Updated on: Oct 12, 2022 | 1:37 PM

आचार संहिता तर लागलीय. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत येतेय, तशा मुंबईतील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय. आतापर्यंतचा घटनाक्रम उत्कंठा वाढवणारा ठरतोय. पहा 10 अपडेट्स!

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक; ऋतुजा लटके, मुरजी पटेल, मशाल, निवडणूक अर्ज, वाचा 10 Updates!
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः एखाद्या निवडणुकीचं गणित मतांच्या आकडेवारीवर ठरतं. उमेदवार तर ताकतीचाच हवा, पण पक्षांचे राजकीय डावपेचही तितकेच शार्प ठरले तर परिणाम दिसून येतात. यासाठीच अंधेरी पूर्व विधानसभा (Andheri East By Poll) निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि शिंदेसेना सर्व शक्ती पणाला लावून उतरली आहे. ही निवडणूक पुढील महिन्यात होतेय. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचा (BCM Election) हा ट्रेलर तर आहेच, पण सत्तांतरानंतर आपलं अस्तित्व दर्शवण्यासाठी शिवसेनेची (Shivsena) ही पहिलीच लक्षवेधी लढाई आहे. निवडणुकीची तारीख जशी जवळ येतेय, तशा राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय. या निवडणुकीतल्या आताच्या 10 अपडेट्स पाहुयात-

  1. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं 11 मे 2022 रोजी निधन झालं. त्यानंतर त्यांच्या अंधेरी पूर्व मतदार संघातील जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
  2. 3 नोव्हेंबर रोजी या जागेसाठी मतदान होणार आहे. 6 नोव्हेंबर रोजी निकाल लागेल 3 ऑक्टोबरपासून याकरिता आचारसंहिता लागू झाली आहे. 14 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येतील. 15 ऑक्टोबरपर्यंत अर्जांची छाननी होईल. 17 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील.
  3.  अंधेरी पूर्व मतदार संघासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस असा महाआघाडीचा उमेदवार म्हणून दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. मात्र अद्याप त्यांनी अर्ज भरलेला नाही.
  4.  ऋतुजा लटके या महापालिकेत कर्मचारी आहेत. निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. मात्र महापालिकेचे अधिकारी राजीनामा मंजूर करत नाहीयेत. अधिकाऱ्यांवर दबाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात येतोय.
  5. तर ऋतुजा लटके यांना शिंदे गटाकडे खेचण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही ठाकरेंकडून करण्यात येतोय. याविरोधात कोर्टात जाण्याची तयारीही ठाकरे गटाने सुरु केली आहे.
  6. भाजपतर्फे मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. पटेल उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. मात्र भाजपच्या तिकिटावर ते उमेदवार असतील का, याची स्पष्टता अद्याप नाही.
  7.  अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव कुणाचं याचा निवाडा करण्याची घाई शिंदे गटाकडून करण्यात आली. पण शिंदे गटाचा उमेदवार या निवडणुकीत उतरेल का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
  8.  निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गट शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे या नावाने धगधगती मशाल या चिन्हावर निवडणूक लढवेल. तर एकनाथ शिंदे यांचा बाळासाहेबांची शिवसेना या नावाने ढाल आणि दोन तलवारी या चिन्हावर निवडणूक लढवेल, असं स्पष्ट झालंय.
  9. दरम्यान, धगधगती मशाल हे आमच्याही पक्षाचं चिन्ह असल्याचा दावा समता पार्टीच्या नेत्यांनी केलाय. 1996  मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने या पक्षाला चिन्ह दिलं असलं तरीही ते 2014 नंतर हे चिन्ह गोठवण्यात आलं होतं.
  10.  आता अंधेरी पोटनिवडणुकीत समता पार्टीही उमेदवार उभा करणार असल्याचं पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं.