सुनिल जाधव, मुंबईः अंधेरी पूर्व विधानसभा मतदार (Andheri East By Poll) संघाच्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटासमोर मोठं संकट उभं ठाकलंय. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला जे मशालीचं चिन्ह दिलंय, तसंच चिन्ह आमच्याही पक्षाचं असल्याचा दावा समता पार्टीच्या (Samata Party) वतीने करण्यात आलाय. समता पार्टी हा मूळ बिहारचा पक्ष आहे. मात्र या पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी आयोगाच्या या निर्णयाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
उद्धव ठाकरे यांची मशाल भगव्या वर्तुळात दाखवलेली आहे. तर समता पार्टीची मशाल दोन हिरव्या पट्ट्यांमध्ये पांढरा पट्टा, असे चित्र आहे.
दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीत आम्हीदेखील आमचा उमेदवार रिंगणात उतरवणार आहोत, से अशी माहिती तृणेश देवळेकर यांनी दिली. 1994 मध्ये दिवंगत जॉर्ज फर्नांडीस यांनी समता पार्टीची स्थापना केली होती. 1996 मध्ये त्यांना हे पक्षचिन्ह मिळालं होतं. 2014 मध्ये समता पार्टीची राज्य पक्ष म्हणून मान्यता काढून घेण्यात आली होती.
देवळेकर यांनी निवडणूक आयोगाला एक ईमेल केला आहे. ते म्हणाले, ‘ 1994 ते 2014पर्यंत मशाल हे आमचं राष्ट्रीय पक्षाचं चिन्ह आहे. 2014 पर्यंत आम्ही त्यावर निवडणुका लढवल्या आहेत. आता अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाला हे चिन्ह दिल्यामुळे आमचा त्यावर आक्षेप आहे…
आम्ही आधीपासूनच निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आम्ही पुढील दोन दिवसात निवडणूक आयोगाकडून आम्हाला नवं चिन्ह दिलं जाईल. त्यावर आम्ही पोटनिवडणूक लढवणार आहोत, असं वक्तव्य देवळेकर यांनी केलंय.
ठाकरे गट आणि शिंदे गटाला अनुक्रमे मशाल आणि ढाल-तलवार ही चिन्हे तात्पुरती मिळाली आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीत तर याचा वापर केलाच जाईल. त्याचप्रमाणे आता समता पार्टीलाही आयोगामार्फत तात्पुरतं दुसरं चिन्ह मिळेल, अशी शक्यता आहे.
ही निवडणूक झाल्यानंतर मात्र समता पार्टी पुन्हा एकदा मशालीच्या चिन्हासाठी आग्रह करणार असल्याचं सांगण्यात येतंय.