अमरावती : “जलयुक्त शिवार या प्रकल्पाला स्थगिती देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुडाचं राजकारण करत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले चांगले काम पुसून टाकण्याचा हा अट्टाहास आहे,” असा आरोप माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केला (Anil bonde criticises uddhav thackeray) आहे.
“जलयुक्त शिवार योजना थांबवणं. त्याला स्थगिती देणे, निधी बंद करुन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश काढणे ही अतिशय चिंतेची बाब आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागातील जनतेच्या तोंडचं पाणी पळवणारी ही बाब आहे. आता ही योजना फक्त रोजगार हमी योजनेत टाकल्याने पुढील 5 वर्षात होणाऱ्या कामांना 25 वर्षे लागतील.” असेही अनिल बोंडे यावेळी म्हणाले.
आम्ही शेतकऱ्यांना चिंतामुक्त करु असे उद्धव ठाकरे म्हणतात. पण जलयुक्त शिवार योजनेला स्थगिती देऊन त्यांना चिंतेत टाकण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे. असाही आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे.उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस सरकारच्या अऩेक कामांना स्थगिती दिली. आरे कारशेड, बुलेट ट्रेन याशिवाय फडणवीसांच्या महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेलाही ठाकरेंनी ब्रेक दिला.
राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या कामाला स्थगिती दिली. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार कामांना निधी न देण्याचे आदेश दिले आहेत. जर कोणत्याही अधिकाऱ्याने जलयुक्त शिवारच्या कामाला पैसे दिले, तर तो आर्थिक गैरव्यवहार म्हणून कारवाई होईल. जर जलयुक्ताची कोणतीही कामं करायची असतील, तर ती रोजगार हमीतून करण्यासाठी मुभा असेल असेही म्हटलं (Anil bonde criticises uddhav thackeray) आहे.