नवी दिल्ली: महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या नेतृत्वाखाली सरकार राज्यात कार्यरत होते. त्यावेळी विरोधकांच्या आरोपांचा राऊत सातत्याने समाचार घेत होते. त्यामुळे तपास यंत्रणांच्या माध्यमातून राऊत यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विरोधकांचा आवाज दडपण्याचा हा प्रकार आहे. लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जात आहे. मात्र, राऊत यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे, असं सांगतानाच संजय राऊत (sanjay raut) लवकरच बाहेर येतील, असा विश्वास शिवसेनेचे नेते अनिल देसाई (anil desai) यांनी व्यक्त केला. शिवसेना नेते संजय राऊत यांना काल मध्यरात्री अटक करण्यात आली. त्यानंतर देसाई यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राऊत यांना आज दुपारी कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे राऊतांना कोठडी होते की जामीन याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संजय राऊत वारंवार शिवसेनेची भूमिका मांडतात. स्पष्ट शब्दात ते विरोधकांना नामोहरम करतात. त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. सर्वोच्च न्यायालयातील अपात्र आमदारांच्या याचिकांवरील सुनावणी आणि या प्रकरणाचा काहीच संबंध नाही. राऊत यांच्या अटकेने या खटल्यावर काहीच परिणाम होणार नाही. इथे कायद्याचं राज्य आहे आणि आमचा कायद्यावर विश्वास आहे, असं अनिल देसाई यांनी सांगितलं.
ईडी ही एक स्वायत्त संस्था आहे. या आधीही संजय राऊतांची चौकशी झाली. मात्र एक नवीन कारण शोधून पुढे आणलं जातंय. केंद्रीय यंत्रणा ज्या कारवाई करतंय ते लोकशाहीला धरून नाही, असंही ते म्हणाले. तसेच आम्ही संसदेत 267 ची नोटीस दिली आहे. सभागृहात स्थनग प्रस्तावाला आम्ही विरोध करू, असंही त्यांनी सांगितलं.
जेपी नड्डा ही माणसं स्वत:ला शक्तीशाली समजतात. भाजपा कसा राष्ट्रीय कार्यक्रम राबवतोय हे दिसून येतंय. मात्र या देशात तरी लोकशाही आहे आणि लोक हे सगळं बघतायेत, असंही ते म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर होत आहे. भाजपला प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यावं लागेल ही गोष्ट आता दूर नाही. तुम्ही नेते विकत घेऊ शकता, मतदार नाही. संजय राऊत हे स्पष्ट वक्ता आहेत. म्हणून त्यांना ईडीत अडकवलंय. घटनेची पायमल्ली होत आहे. याचा भाजपला एक दिवस जाब द्यावा लागेल. कृपाशंकर सिंह यांच्याबाबतही भाजपने चर्चा केली होती. त्याचं काय झालं? असा सवाल अनिल गोटे यांनी केला.
किरीट सोमय्या हे एक प्यादं आहे. खरे सूत्रधार फडणवीस आहेत, असा दावा गोटे यांनी केला. राऊत यांच्याकडे सापडलेल्या पैशावरूनही गोटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तोफ डागली. शिंदेही लाभार्थी आहेत. त्यांचंही नाव होतं ना? मग त्यांची का चौकशी केली नाही? असा सवाल गोटे यांनी केला आहे.