मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पुन्हा एकदा सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी चौकशीला दांडी मारली आहे. ईडीने समन्स देऊनही अनिल देशमुख चौकशीला गेले नाहीत. मागील दोन महिन्यांपासून ईडीकडून देशमुखांना समन्स बजावण्यात येत आहे. मात्र, देशमुख चौकशीला हजेरी लावत नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता ईडी कोणती कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी देशमुख यांना समन्स पाठवून 18 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावल होतं. मात्र, देशमुख आलेच नाहीत. आज पुन्हा एकदा त्यांनी आपण येत नसल्याचं निवेदन ईडीच्या अधिकाऱ्यांना दिलं आहे. (Anil Deshmukh absent from inquiry even after ED’s fifth summons)
अनिल देशमुख यांना ईडीने आतापर्यंत 5 समन्स बजावले आहेत. त्यात पहिलं समन्स 25 जून रोजी देऊन 26 जून रोजी हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं. दुसरं समन्स तात्काळ 26 जून रोजी देऊन आठवड्या भरात म्हणजे 3 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. तिसरं समन्स बजावल्यानंतर 5 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. तर चौथ समन्स 30 जुलै रोजी पाठवून 2 ऑगस्ट रोजी हजर राहण्याबाबत सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आजचं हे पाचव समन्स होत.16 ऑगस्ट रोजी समन्स पाठवून त्यांना आज 18 ऑगस्टला हजर राहण्यासाठी सांगितलं गेलं होतं. मात्र, आजही देशमुख आले नाहीत. त्यांनी त्यांचे वकील इंदरपाल सिंग यांना निवेदन घेऊन पाठवलं होतं.
दरम्यान, सुप्रीम कोर्टात आमची याचिका दाखल झाली आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल आहेत. त्याच्याशी आमची याचिका जोडली गेली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट जो निकाल देईल तो आम्हाला मान्य असेल. पण जोपर्यंत आमचं प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे, तोपर्यंत आम्हाला समन्स पाठवलं जाऊ नये. आम्हाला सवलत द्यावी. आमच्यासाठी अनेक कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. हा गुन्हा रद्द करण्यासाठी कोर्टातही जाऊ शकतो. त्यामुळे आम्हाला समन्स पाठवलं जाऊ नये, असं अनिल देशमुख यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
अनिल देशमुख यांना पहिलं समन्स 25 जून रोजी पाठवण्यात आलं होतं. त्याला अनिल देशमुख यांनी उत्तर दिलं होतं. आपल्या विरोधात दाखल गुन्ह्याची आपल्याला प्रत देण्यात यावी. आपल्या विरोधात काय पुरावे आहे त्याची माहिती देण्यात यावी, असं अनिल देशमुख यांचं सुरुवातीला म्हणणं होतं. त्याचबरोबर त्यात त्यांनी आपण 72 वर्षाचे आहोत. आपल्याला अनेक आजार आहेत. सध्या कोविडचा काळ आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपली ऑनलाईन चौकशी करावी, असंही देशमुख यांचं म्हणणं होतं. आता पुन्हा आपण ऑनलाईन चौकशीला तयार असल्याचं देशमुख यांचं म्हणणं आहे. मात्र, ईडीचे अधिकारी त्यांना ही सवलत देतात का, हे पहावं लागणार आहे.
संबंधित बातम्या :
Anil Deshmukh: सीबीआयची चौकशी टाळण्यासाठी अनिल देशमुख दिल्लीत; ‘या’ बड्या वकिलाची भेट
Anil Deshmukh absent from inquiry even after ED’s fifth summons