मुंबईः माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अखेर कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मनी लाँड्रिंग (Money laundering ) प्रकरणी त्यांना ईडी (ED) कडून अटक झाली होती. महाराष्ट्राच्या राजकारणातली ही सर्वात मोठी बातमी आहे. तब्बल 11 महिन्यांच्या कोठडीनंतर अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाला.
काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांची तुरुंगात असतानाचा प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांच्या जामीनासाठी प्रयत्न सुरु होते.
ईडीच्या प्रकरणी अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र ते अद्याप तुरुंगातून बाहेर येणार नाहीत. त्यांच्याविरोधात सीबीआयनेही एक गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कोर्टाने जैसे थे निर्णय दिलेला आहे.
अनिल देशमुखांचे वकील विक्रम चौधरी आणि अनिकेत निकम यांनी कोर्टात युक्तिवाद केलाय. अनिकेत निकम यांनी याविषयी माध्यमांना माहिती दिली. म्हणाले, अनिल देशमुखांचा जामीन मा. न्यायालयाने मंजूर केला आहे. प्रामुख्याने उच्च न्यायालयात यासंबंधीचा युक्तिवाद केला होता.
ईडीने केलेल्या आरोपांमध्ये अनिल देशमुख हेच नंबर एकचे दोषी आहेत किंवा यांच्या म्हणण्यानुसार हफ्ता वसुली होत होती… हे ईडीच्या तपासात कुठेही दिसून येत नाही, असा युक्तिवाद करण्यात आला.
तसेच सचिन वाझे हे या प्रकरणी सहआरोपी आहेत. त्यांनी वेगवेगळे जबाबदार दिले आहेत. तसेच माफीचा साक्षीदार बनतो, अशी विनंती करत आहेत. अनिल देशमुख यांच्याविरोधात परिस्थिती जन्य पुरावा कोणताही नाही…. असा युक्तिवाद वकिलांनी केला.
अनिल देशमुख 73 वर्षांचे आहेत. त्यांना आरोग्याच्या समस्या आहेत. त्यामुळे पीएमएलए कायद्यानुसार त्यांना डांबून ठेवणं ते सकृतदर्शनी बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद करण्यात आला.
एक लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात येईल. तसेच अनिल देशमुख यांनी जामीनानंतर ईडीच्या तपासाता हस्तक्षेप न करणे, तपासाला सहकार्य करणे आणि पासपोर्ट जमा करून देणे, या अटी घालण्यात आल्या आहेत.
उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद मंजूर करून अनिल देशमुखांचा जामीन मंजूर केलेला आहे.