Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर जेलबाहेर, स्वागतासाठी अजित दादा, सुप्रिया सुळे, जयंत पाटलांची विशेष उपस्थिती

| Updated on: Dec 28, 2022 | 5:00 PM

100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती.

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर जेलबाहेर, स्वागतासाठी अजित दादा, सुप्रिया सुळे, जयंत पाटलांची विशेष उपस्थिती
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची आज अखेर जामीनावर सुटका झाली आहे. आर्थर रोड (Arthur road) तुरुंगातून ते बाहेर आले. देशमुख यांचा जामीन रद्द करण्याची सीबीआयची (CBI) मागणी हाय कोर्टाने फेटाळल्यानंतर आज बुधवारी अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर आले.
100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. आज सव्वा वर्ष म्हणजे 13 महिने  26 दिवसांच्या कोठडीनंतर ते बाहेर आले आहेत.

अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी जेलबाहेर स्वागतासाठी हजेरी लावली. अनिल देशमुख यांची सुटका होणार, या बातमीनंतर आर्थर रोड तुरुंगाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी जमा झाली.

आर्थर रोडबाहेर टायगर इज बॅक, हौसला बुलंद रहे, अशा आशयाचे बॅनर घेतलेल्या कार्यकर्त्यांची जेलबाहेर प्रचंड गर्दी जमा झाली आहे.

अवघा महाराष्ट्र उत्सुक- जयंत पाटील

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अटक करून सत्तारुढ केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातलं मविआ सरकारचं अडचणीत आणण्यासाठी अनेक कारवाया झाल्या. त्यापैकी या दोन कारवाया आहेत. न्यायदेवतेने आज न्याय केल्याचं आजचं चित्र आहे. त्यामुळे त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

109 वेळा धाडी हा जागतिक विक्रम- सुळे

केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातलं ईडी सरकार विरोधात काही करत असेल तर त्याला आधी एजन्सीची भीती दाखवायची.. भुजबळ, राऊत आता देशमुखांचीही केस आपण पाहिली. सव्वा वर्ष अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकलेलं आहे.

अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांनी काय झेललंय, हे मी खूप जवळून पाहिल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

अनिल देशमुखांविरोधात ईडीने 109 वेळा धाड टाकली. पण एकही वेळा काहीही हाती आलं नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. हा जागतिक विक्रम असल्याचंही त्यांनी ठासून सांगितलं…

 ED आणि CBI दोन्ही जामीन मंजूर

ED आणि CBI दोन्ही संस्थांच्या आरोपांमध्ये अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. 12 डिसेंबर रोजी मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांचा जामीन मंजूर केला होता. मात्र सीबीआयने या जामीनाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आता ही याचिका कोर्टाने फेटाळल्याने आज त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला.

या अटींचं पालन करावं लागणार…

अनिल देशमुख यांना सव्वा वर्षानंतर जामीन मिळाल्यानंतरही त्यांना जेलबाहेर काही अटींचं पालन करावं लागणार आहे. त्यांना विना परवानगी मुंबईच्या बाहेर जाता येणार नाही.

तसेच कोर्टाच्या कार्यक्षेत्राबाहेर जाण्याकरिता परवानगी घेणं बंधनकारक आहे. मुंबईतील राहतं घर वगळता त्यांना इतरत्र राहायला जाण्यास मनाई आहे.