पुणे : “चुकीचे विधान माझ्या तोंडी टाकण्यात आलं आहे. व्हिडीओ क्लिपिंग पाहा. मी या गोष्टी जाहीरपणे बोलू शकत नाही, इतकंच बोललो होतो” अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, या दाव्यावरुन घूमजाव केले. (Anil Deshmukh takes U turn on claims of IPS officers allegedly trying to overthrow Mahavikas Aghadi Govt)
“चुकीचे विधान माझ्या तोंडी टाकण्यात आलं आहे. मी या गोष्टी जाहीरपणे बोलू शकत नाही, एवढंच माझं वाक्य आहे. शेवटी मी कुटुंबप्रमुख आहे. आम्ही पोलीसवाले संपूर्ण कुटुंब म्हणून काम करतो.” असं देशमुख म्हणाले.
अनिल देशमुख काय म्हणाले होते?
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न पोलिस अधिकाऱ्यांनी केला होता, असा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्याचे समोर आले होते. ‘लोकमत ऑनलाईन’च्या विशेष मुलाखतीत याबाबतचा दावा त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न चार ते पाच पोलीस अधिकाऱ्यांनी केला होता. यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तो वेळीच थांबवला गेला” असे अनिल देशमुखांनी सांगितले होते.
“आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहे असे वारंवार सांगितले गेले. त्यानंतर स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमच्यात याविषयी चर्चा झाली होती. त्यानंतर हे प्रकरण मार्गी लावण्यात आले” असेही देशमुख म्हणाले होते.
“शरद पवारांनी एका महिला अधिकाऱ्याचे नाव घेऊन त्यांना तातडीने पदावरुन बाजूला करा, त्यांच्याकडे दुसरे काम द्या असे सांगितले होते. तसेच, एका नेत्याने चारही अधिकाऱ्यांची नावे त्यावेळी सांगितली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वेळीच थांबवला गेला” असा दावाही अनिल देशमुख यांनी केला होता.
“नुकत्याच झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलींमध्ये त्यातील अधिकाऱ्यांची बदली केली गेली. तर काही अधिकाऱ्यांना आजही महत्त्वाची पदं दिली आहेत” असेही अनिल देशमुख म्हणाले होते.
“अमिताभ गुप्ता यांच्या हातून मोठी चूक”
“आयपीएस अधिकारी अमिताभ गुप्ता यांच्या हातून मोठी चूक झाली. त्याचं समर्थन करणार नाही. त्याची शिक्षा त्यांना दिली गेली. पण अमिताभ गुप्ता हे चांगले अधिकारी आहेत. त्यांचा आजवरचा ट्रॅक रेकॉर्ड चेक केला गेला” असे अनिल देशमुख यांनी सांगितले.
बदलीनंतर अमिताभ गुप्ता यांनी आजच पुणे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. वाधवान कुटुंबाला कोरोना लॉकडाऊनच्या काळात महाबळेश्वरला जाऊ देण्याच्या पत्रावरील स्वाक्षरीवरुन गुप्ता यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. (Anil Deshmukh takes U turn on claims of IPS officers allegedly trying to overthrow Mahavikas Aghadi Govt)
मराठा समाजासाठी आरक्षणातील 13 टक्के जागा राखीव ठेवूनच भरती करण्याचा प्रयत्न आहे. कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही, अशी हमी अनिल देशमुख यांनी दिली.
VIDEO : पोलीस अधिकाऱ्यांकडून महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न, अनिल देशमुखांचा गौप्यस्फोटhttps://t.co/QoqhGR4LS6
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 20, 2020
संबंधित बातम्या :
अनिल देशमुखांनी शरद पवारांकडून क्लासेस घ्यावेत, भाजपचा टोला
पोलीस अधिकाऱ्यांकडून महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न, अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट
(Anil Deshmukh takes U turn on claims of IPS officers allegedly trying to overthrow Mahavikas Aghadi Govt)