धुळे : काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शब्द फिरवतात, असा आरोप माजी आमदार अनिल गोटे (anil gote dhule) यांनी केला आहे. राज्यात सध्या सत्ता स्थापनेवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री शब्दांचे खेळ करतात, असा आरोप काल (8 नोव्हेंबर) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केला होता. याच पार्श्वभूमीवर अनिल गोटेंनीही (anil gote dhule) आज (9 नोव्हेंबर) पत्रक काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शब्द फिरवतात. माझा अनुभव हा उद्धव ठाकरे यांच्यासारखा आहे. फडणवीस यांच्याकडून सत्याची अपेक्षा करणे म्हणजे धोत्र्याच्या फुलाकडून गुलाबाची अपेक्षा करणे, असंही अनिल गोटे यांनी नमूद केले.
देवेंद्र फडणवीस यांची फसवणूक केल्याचा खुला आरोप उद्धव ठाकरे यांनी केला, याचे मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. देवेंद्र फडणवीसांच्या अशा लबाडीच्या वागण्यामुळेच मी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन पक्षातून बाहेर पडलो, असा आरोप गोटे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर केला आहे.
2009 ते 2014 या काळात मी विरोधी पक्षात राहिलो. आयुष्यभर भाजपच्या विचाराला विरोध करणाऱ्यांच्या विरुद्ध संघर्ष केला. पण माझ्या विरुद्धच कारस्थान करुन ज्यांच्याविरुद्ध मी लढलो, अशा 40 नामचीन गुंडाना पक्षात घेऊन माझ्या अंगावर सोडले, असंही गोटे यांनी पत्रातून सांगितले.
देवेंद्र फडणवीस हे कट करास्थान करतात. आपल्या पक्षाच्या विरोधकांना बळ देऊन पक्षातील लोकांचा छळ करतात. माझा पण छळ केला म्हणून मी भाजप सोडली, असे आरोप गोटे यांनी फडणवीस यांच्यावर केले.
दरम्यान, शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेनेकडून अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची मागणी भाजपकडे केली जात आहे. मात्र भाजप मुख्यमंत्रिपद सोडत नसल्यामुळे दोन्ही पक्षात सत्ता स्थापनेवरुन संघर्ष पाहायला मिळत आहे. राज्यात कुणाची सत्ता स्थापन होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.