रत्नागिरी : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेत अनिल परब (Anil Parab) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. अनिल परब हे शिवसेना संपवायला निघालेत, असंही रामदास कदम म्हणाले होते. त्यानंतर आता अलीकडेच राज्यात एकनाथ शिंदे यांचा बंड झालं आणि ठाकरेंच्या शिवसेनेतला एक मोठा गट शिंदेंसोबत गेला आणि राज्यात नवं सरकार उदयाला आलं. शिंदेंसोबत गेलेल्या या गटात आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) हेही होते. आता योगेश कदम यांनीही पुन्हा अनिल परब यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. अनिल परब हे राष्ट्रवादीला हाताशी धरून शिवसेना संपवत आहेत, असा थेट आरोप योगेश कदम यांनी केलाय. त्यामुळे पुन्हा अंतर्गत मतभेदांना उत आला आहे.
मी गुवाहाटीला पळून गेलेलो नाही. मी इथे जातोय याची कल्पना शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना दिली होती. पालकमंत्री अनिल परब हे माझ्या मतदारसंघात राष्ट्रवादीला हाताशी धरून शिवसेनेला संपवत होते, या घाणेरड्या राजकारणाला कंटाळून मी एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. मी एकनाथ शिंदे गटात सामील होताना शिवसेना नेते रामदास कदम यांना देखील सांगितलं होतं. तिथे गेल्यानंतर देखील मी वडील या नात्याने रामदास कदम यांच्या संपर्कात होतो. असे योगेश कदम म्हणाले आहेत.
रामदास कदम या साऱ्या राजकीय घडामोडीत मला सल्ले देत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर माझ्यासह अनेक आमदार पुढचे चार-पाच दिवस झोपलेले नाहीत. अनिल परब माझ्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या मी पराभूत केलेल्या उमेदवाराला मदत करत होते, असा आरोप ही योगेश कदम यांनी केला आहे.
तसेच गुवाहाटी मधील बारा दिवस कुटुंबापासून वेगळं राहणं हे फार अवघड होतं. मुंबईत परतल्यानंतर माझ्या कुटुंबाला गुपचूप हॉटेलवर बोलवून घेतलं आणि मी माझ्या मुलीला भेटलो, अशी आठवणी त्यांनी या बंडातली सांगितली आहे.
तसेच कोकणाला नक्कीच मंत्रीपद मिळेल. कोकणात शिवसेनेचा झंजावत पुन्हा दिसणार आहे. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. शिवसेना आमच्या अजूनही हृदयातच आहे. असा विश्वास ही योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे. तसेच गुवाहाटीला जाण्याअगोदर एकनाथ शिंदे संपर्कात होते असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.