ठाकरे कुटुंबातील व्यक्ती ‘सामना’च्या संपादकपदी, ही शिवसेनेसाठी आनंदाची बाब : अनिल परब

| Updated on: Mar 01, 2020 | 7:08 PM

'अशीच जवळची व्यक्ती 'सामना'च्या संपादकपदी असली पाहिजे. ज्याला बाळासाहेबांचे विचार माहिती आहेत, बाळासाहेबांची विचारधारा माहिती आहे'

ठाकरे कुटुंबातील व्यक्ती सामनाच्या संपादकपदी, ही शिवसेनेसाठी आनंदाची बाब : अनिल परब
Follow us on

मुंबई : ठाकरे परिवारातील एक व्यक्तिमत्व ‘सामना’च्या (Anil Parab On Rashmi Thackeray ) संपादकपदी नियुक्त झालं असेल, तर शिवसेनेसाठी ही आनंदाची बाब आहे, असं मत परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केलं. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. यावर अनिल परब यांनी ही प्रतिक्रिया दिली.

“सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे. बाळासाहेबांच्या विचारधारेतून (Anil Parab On Rashmi Thackeray ) ते तयार झाले आहे. त्यामुळे बाळासाहेबांची विचारधारा ज्यांना अतिशय जवळून माहिती आहे, अशीच जवळची व्यक्ती ‘सामना’च्या संपादकपदी असली पाहिजे. ज्याला बाळासाहेबांचे विचार माहिती आहेत, बाळासाहेबांची विचारधारा माहिती आहे, म्हणून ठाकरे परिवारातले एक व्यक्तिमत्व ‘सामना’च्या संपादकपदी नियुक्त झाला असेल, तर मला असं वाटतं की शिवसेनेसाठी ही आनंदाची बाब आहे”, असं मत परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केलं.

कोणी इशारा दिला तरी आम्ही अयोध्येला जाणार : अनिल परब

हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला. त्यांनी ट्विटरवर “उद्धव ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही,” असा इशारा दिला. यावर अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली. “इशारा देऊन शिवसेना आपलं हिंदुत्व सोडेल, असा काही विषय नाही. बाळासाहेबांनी पहिलेपासून भूमिका घेतली आहे, आम्ही हिंदुत्ववादी आहोत किंवा दुसरा धर्माचा आम्ही दुस्वास करत नाही. ही तर वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मी दुसरा कुठल्या धर्माचा विश्वास करत नाही. आम्ही हिंदुत्ववादी आहोत ही भूमिका काही लपवलेली नाही आणि हिंदुत्ववादी आहोत म्हणून तर आयोध्येला चाललो आहोत. ‘जय श्री राम’चा आशीर्वाद घेऊन आम्ही सरकार स्थापन केले. त्याची पूजा करायला जाणं, हे काही चुकीचं नाही. त्यामुळे ती पूजा कोणी काढू शकत नाही.”

“आम्ही कोणाच्या इशाऱ्यावर चालणारे लोक नाही. आम्हाला असं वाटतं, की अयोध्येत जाऊन श्री रामाचा आशीर्वाद घेतला पाहिजे. त्यामुळे आम्ही जाणारच. कोणाला इशारा द्यायचं तो त्यांचा विषय आहे. कोणी इशारा दिला तरी आम्ही जाणार आहोत. देवाचा आशीर्वाद घेणं मिशन नसतं. देवाचा आशीर्वाद हा श्रद्धेचा भाग आहे. त्यामुळे श्रद्धेने जाऊ श्रद्धेने येऊ”, असंही अनिल परब म्हणाले.

रश्मी ठाकरे सामनाच्या नव्या संपादक

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी ‘सामना’ दैनिकाचं संपादकपद सोडलं होतं. त्यानंतर ही जबाबदारी कुणाकडे दिली जाणार याविषयी बरीच उत्सुकता होती. त्यानंतर जवळपास 2 महिन्यानंतर रश्मी ठाकरे यांची सामनाच्या संपादकपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रश्मी ठाकरे (Anil Parab On Rashmi Thackeray) यांना पहिल्या महिला संपादक होण्याचा मान मिळाला आहे.