शिंदे गटाने शिवसेनेला (shiv sena) आणखी एक मोठा धक्का दिला आहे. वरुण सरदेसाईंची (Varun Sardesai) युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. वरुण सरदेसाई यांच्या हकालपट्टीनंतर शिंदे गटाकडून किरण साळी (Kiran Sali)यांची युवासेनेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वरुण सरदेसाई आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत मिळून सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले आहेत. ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं शिंदे गटात सहभागी झाले आहेत. दुसरीकडे शिंदे गट आमिष आणि दबाव टाकून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या गटात समील होण्यासाठी बाध्य करत असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.
वरुण देसाई हे युवासेना प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत. वरुण देसाई यांना पक्षाने युवासेनेच्या राज्य सचिवपदाची जबाबदारी सोपवली होती. वरुण देसाई यांनी अभियांत्रिकेचे शिक्षण घेतले आहे. ते अतिशय आक्रमक स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. त्यांचा युवासेनेच्या अनेक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. या वादात वरुण देसाई यांनी उडी घेत राणे यांच्या निवासस्थानाबाहेर तीव्र आंदोलन केले. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता. आदित्य ठाकरे हे मंत्री झाल्यानंतर युवासेनेला एका सक्षम आणि विश्वासू नेतृत्वाची गरज होती. ती गरज वरुण देसाई यांनी पूर्ण केली. मात्र आता शिंदे गटाकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी किरण साळी यांना संधी देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यानंतर अनेक आमदार शिंदे यांना येऊन मिळाले. पुढे एकनाथ शिंदे गट आणि भाजपा मिळून सत्ता देखील स्थापन झाली. एकना शिंदे गटाने शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली. तसेच त्यांच्यावर घणाघाती टीका देखील केली. मात्र आतापर्यंत ठाकरे घराण्याशी थेट संबंध असलेल्या एकाही व्यक्तीवर शिंदे गटाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र आज अचानक शिंदे गटाकडून वरुण देसाई यांची युवासेनेच्या राज्य सचिवपदावरू हकालपट्टी करण्यात आली. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे.