बीड : सत्तेत असोत अथवा नसो पण भारतीय जनता पार्टीच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) ह्या कायम चर्चेत असतात. मध्यंतरी विधान परिषदेवर वर्णी लागली नाही तेव्हाही त्या चर्चेत होत्या. आता तर त्यांनी मोठे विधान केले असून पुन्हा त्या चर्चेच्या केंद्रबिंदू राहतील. यावेळी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबाबत हे विधान केले आहे. जर मी तुमच्या मनात असेल तर मोदीजी देखील मला संपवू शकणार नाहीत असे त्या म्हणाल्या आहे. घराणेशाही आणि भाजपाची भूमिका याबद्दल बोलत असताना त्यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सक्रीय राजकारणापासून दुरावलेल्या पंकजा मुंडे पुन्हा या वक्तव्यावरुन चर्चेत आल्या आहेत.
नवरात्र महोत्सावाला सुरवात झाली असून पंकजा मुंडे आणि खा. प्रीतम मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या देवींचे दर्शन घेतले आहे. एका कर्यक्रमात भाजप पक्षीत घराणेशाहीला महत्व नाही हे सांगताना त्यांनी हे विधान केले आहे.
मला देखील राजकीय वारसा आहे. पण मला कोणी वारस्याच्या सहायाने राजकारण करते असे म्हणणार नाही. शिवाय मोदीजी देखील मला हरवू शकणार नाहीत, फक्त मी तुमच्या असणे गरजेचे आहे. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राजकारणातूनच महत्वाचे निर्णय होतात. पण याला घराणेशाही लागून आली तर ते शक्य नाही. शिवाय घराणेशाही विरहित राजकारण झाले तरच या क्षेत्रात स्वच्छता येणार आहे. आताच्या तरुण पिढीचे चांगले भवितव्य घडवण्यासाठी राजकारणात बदल महत्वाचे आहेत.
सध्याचे राजकारण म्हणजे एक करमणूकीचे साधन होत आहे. सण उत्सवांना देखील राजकीय स्वरुप दिले जात आहे. यंदाचा गणेशोत्सव, नवरात्र याला देखील राजकीय रंग आहेत. पण हे विकासासाठी चांगले नाही. असे म्हणत पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला घरचा आहेरच दिला आहे.
सणोत्सवाला राजकीय स्वरुप द्यायचे ही भाजपाची संस्कृती नाही. शिवाय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अटल बिहारी वाजपेयी यांना देखील न पटणारेच आहे. त्यामुळे राजकारण हे विकासाच्या दृष्टीने होणे महत्वाचे आहे. असे म्हणत त्यांनी शिंदे गट आणि राज्य सरकारवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.